सॅनिटायझरपेक्षा साबण जास्त सुरक्षित; अति वापराचा धोका?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना विषाणू रोखण्यासाठी वेळोवेळी हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा अशा समाज प्रबोधन करणाऱ्या उद्घोषणा आणि जाहिराती आपण पाहिल्या आहेत. मात्र कोरोना संकटकाळात सॅनिटायझरचा वापर प्रमाणापेक्षा जास्त होत असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक जण खिशात किंवा बॅगेत सॅनिटायझर नेत असून बाहेर जाताना, किंवा संस्थेत काम करताना सॅनिटायझरचा वापर करत आहे.

मात्र सॅनिटायझरचा अति वापर धोकादायक असून साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तरच त्याचा वापर करावा असे डॉक्टरांनी म्हटले आहे. साबण आणि पाण्याला पर्याय म्हणून सॅनिटायझर वापरणे कधीही योग्य नाही, असे डॉक्टरांनी सांगितले ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

राम मनोहर लोहिया (आरएमएल) रुग्णालयाचे त्वचारोग तज्ञ डॉ. कबीर सरदाना यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सॅनिटायझरचा वापर जास्त प्रमाणात करू नये. यामुळे त्वचेवर असणाऱ्या पेशींवर परिणाम होतो. पाण्याचा अभाव होऊन त्वचा कोरडी पडू शकते.

सॅनिटायझरचा प्रभाव किती काळ राहतो?
साधारणपणे सॅनिटायझरचा वापर त्वचेवर असणारा व्हायरस, फंगल आणि अपायकारक पेशी यांचा खात्मा करण्यासाठी केला जातो. सॅनिटायझरच्या वापरामुळे त्या स्थानावरील बॅक्टेरिया आणि व्हायरस मरून जातात. मात्र सॅनिटायझर प्रभाव जास्तीत जास्त 4 ते 5 मिनिटं राहतो. यानंतर त्यातील अल्कहोल उडून जाते. यामुळे तुम्ही हात सॅनिटाईज केले आणि इतर कोणत्याही जागेला स्पर्श केल्यास पुन्हा बॅक्टेरिया त्या भागावर येऊ शकतात.

त्वचेचे आजार होऊ शकतात
कोणत्याही गोष्टीचा अति वापर घातक असतो. सॅनिटायझरचे देखील असेच असून सॅनिटायझरमुळे हात जंतूमुक्त होत असले तरी यामुळे त्वचेला नुकसान देखील होते. संवेदनशील त्वचा असणाऱ्या लोकांना यामुळे त्या जागी खाज येणे, जळजळ होणे, त्वचा खरबुडी होणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सॅनिटायझर पोटात गेल्यास?
समजा सॅनिटायझर चुकून पोटात गेल्यास मोठा धोका होऊ शकतो. लहान मुलांना याचा अधिक धोका असून यामुळे विषबाधाही होऊ शकते. त्यामुळे लहान मुलांच्या हाताला लागणार नाही अशा जागी सॅनिटायझर ठेवणे योग्य.

Post a Comment

Previous Post Next Post