श्रीरामपूर जिल्ह्यासाठी 'ते' राहणार अनवाणी; कृती समितीद्वारे तनपुरेंना साकडे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवशीच (१२ डिसेंबर) जिल्हा विभाजन करा व नव्या श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मिती करा, असे साकडे श्रीरामपूर जिल्हा कृति समितीने माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना घातले आहे. एवढेच नव्हे तर कृती समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी पवारांच्या वाढदिवसाच्या तारखेपर्यंत श्रीरामपूर जिल्हा घोषित व्हावा म्हणून तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा व अनवाणी राहण्याचा संकल्प केला आहे. ४५ वर्षाचा जिल्हा विभाजन प्रश्न मार्गी लागावा व श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधले जावे यासाठी उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी १२/१२/२०२०पर्यंत अनवाणी राहण्याचा संकल्प केल्याचे जाहीर केले आहे.

१२ डिसेंबरला राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पवार यांचा वाढदिवस आहे व राज्याचे हिवाळी अधिवेशनही 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जिल्हा विभाजन प्रश्नाचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा. प्रायोगिक तत्वावर कमी खर्च येणाऱ्या श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी म्हणून माजी खासदार प्रसाद तनपुरे यांना श्रीरामपूर जिल्हा कृती समितीद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी लांडगे यांच्यासह श्रीरामपूर राष्ट्रवादी शहराध्यक्ष लकी सेठी, सहसमन्वयक भावेश ठक्कर, अजिंक्य झिरपे, विजय मुथा उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच यासंदर्भात भेट घेऊ, सर्वांना बरोबर घेऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन तनपुरे यांनी कृती समिती शिष्टमंडळाला यावेळी दिले.

तनपुरे यांना श्रीरामपूर जिल्हा कृती समिती संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सरकार दरबारी केलेल्या पाठपुराव्याची माहिती यावेळी देण्यात आली. श्रीरामपूर जिल्हा कृति समितीद्वारे १२/११/२०२० ते १२/१२/२०२० या काळात श्रीरामपूर जिल्हा संकल्प अभियान राबविणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले. शासनाच्या निकषांच्या आधारे बहुतांशी सरकारी कार्यालये श्रीरामपुरात आज कार्यान्वित आहेत. उर्वरित कार्यालयांसाठी मुबलक जागाही उपलब्ध होईल. आवर्ती-अनावर्ती खर्चाचा विचार करता सर्वात कमी खर्च श्रीरामपूर जिल्ह्यासाठी येणार असल्याचे सांगितल्यावर तनपुरेंनी त्याला दुजोराही दिला. तसेच अनेक जिल्ह्याची लोकसंख्या अवघी १२-१८ लाख असताना त्यांना स्वतंत्र जिल्हाधिकारी आहे आणि नगर जिल्ह्याची लोकसंख्या मात्र 50 लाखाहून अधिक असतानाही एकच जिल्हाधिकारी आहे. नगर जिल्हा सर्वात मोठा असल्याने करोना संकटावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागली आहे, हेही त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे भविष्यात छोटे जिल्हे करून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाला जोडणे क्रमप्राप्त आहे. जिल्हा विभाजनाने भविष्यातील स्थानिक पातळीवर नवीन रोजगाराच्या, उद्योगाच्या, शिक्षणाच्या संधीसह, आरोग्याच्या सुखसुविधा उपलब्ध होतील तसेच सर्वसामान्याच्या क्रयशक्तीमध्ये होणारे बदल यावरही यावेळी चर्चा झाली. यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न होण्यासाठी सर्वतोपरी सकारात्मक प्रयत्न करण्याची ग्वाही तनपुरेंनी दिल्याने कृती समितीने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post