राज्यपाल कोश्यारी आणि फडणवीस यांच्यात 'ही' डील? ज्येष्ठ मंत्र्याचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

विधान परिषदेसाठी मंत्रिमंडळाकडून पाठवली जाणारी 12 सदस्यांची नावे बाजूला ठेवण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या चर्चेत हे आधीच ठरले आहे, असा गौप्यस्फोट ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती एका ठिकाणी सांगितल्याने ही कुरघोडी समोर आल्याचेही त्यांनी सांगितले.

पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सांत्वनासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वारणा येथे गेले होते. सांत्वन सोडून कोरे यांच्याशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांच्यात विधान परिषदेसाठी मंत्रिमंडळाकडून पाठवली जाणारी 12 सदस्यांची नावे बाजूला ठेवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. यावेळी केडीसीसीचे संचालक प्रताप ऊर्फ भय्या माने आणि जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील हे तेथे उपस्थित होते. मास्क लावल्याने ते त्यांच्या लक्षात आले नसल्याची माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान, संविधानाच्या पलीकडे जाऊन राज्यपाल राजकीय निर्णय घेत आहेत. राज्यपालांचा राज्यकारभारात हस्तक्षेप सुरू असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी यावेळी केला.

Post a Comment

Previous Post Next Post