दिवाळी भेट : यंदा मिठाईसह मास्क व सॅनिटायझर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवाळीनिमित्त व्यावसायिक व मित्रत्वाचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी मिठाई भेट देण्याची पद्धत असते. यंदा या पद्धतीने आरोग्यम धनसंपदा महत्त्वाची मानली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरची बाटलीही मिठाईसमवेत अनेकांनी दिली आहे.

एरवीच्या चॉकलेट, काजू-बदाम, पणत्या, कपडे यांच्याऐवजी यंदा भेटवस्तूंच्या टोपलीत आरोग्य-अर्थ साहित्य-उत्पादनांची रेलचेल दिसली. मास्क, सॅनिटायझर आदींबरोबरच रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधे देण्याकडेही कल दिसला. आरोग्याबरोबरच आर्थिक साक्षरतेलाही यंदाच्या सणांमध्ये प्राधान्य दिले गेले. विमा योजना, डिमॅट खाते, विविध बचत योजना व पर्याय यांच्या माहितीसह त्यातील गुंतवणुकीची प्रत्यक्ष सुरुवात करून देण्याकडे कल दिसला. करोना साथ आणि टाळेबंदीतून ग्राहक वर्गाची आता सुटका होत असून यंदाची दिवाळी पुनःश्च हरिओम करण्याची संधी असल्याची भावना समाजामध्ये आहे. मात्र, प्रत्यक्ष भेटीगाठी टाळत भेटवस्तूंची परंपरा जपतानाही आरोग्याविषयीची काळजी व प्राधान्य दिसून आले. १० रुपयांचे मास्क ते ५०० रुपयांचे विमा गिफ्ट कार्ड, १,००० रुपयांचे कोविड प्रतिबंधक साहित्याचे कीट अशा अनोख्या वस्तू यंदा भेटकर्त्यांकडून परिचितांना पाठवल्या गेल्या आहेत.

भेटवस्तू देण्यातील कल यंदा काही प्रमाणात बदलला आहे. मात्र आर्थिक साक्षरतेबाबत, आर्थिक स्ववलंबनाविषयीची जाणीव वाढली आहे. तंत्रस्नेही (डिजिटल) माध्यमांमुळे अनेकांनी आर्थिक नियोजन, भविष्यातील आर्थिक तरतूद यासाठी निवृत्तीपूर्वीची तयारी केल्याचे या कालावधीत दिसून आले. भारतीय संस्कृतीत एक परंपरा म्हणून सदिच्छेसह भेटवस्तू देण्याचा प्रघात आहे. सणांच्या निमित्ताने भेटवस्तू देणे ही त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकेत समजला जातो. भेटवस्तूंच्या यादीत सुकामेवा, आवडीच्या वस्तू दिल्या जात असल्या तरी उपयुक्तता आणि मोल यांचा समतोल साधला गेल्या यंदा दिसले आहे. टाळेबंदी शिथिल झाली असली तरी करोनाची धास्ती कायम असल्याने अनेकांना स्वतःच्या सीमित कुटुंबाबरोबरच यंदाची दिवाळी साजरी करणे भाग पडले आहे. बाजारपेठेतही अत्यावश्यक वस्तूंसाठीची खरेदी होत आहे. चैनीच्या वस्तू खरेदीचा मोह यंदा टाळला जात आहे. वर्ष २०२० च्या मावळतीला भेटीगाठीची उणीव यंदा अनोख्या भेटवस्तू देऊन भरून काढण्याचा प्रयत्न होत आहे. यंदाच्या दिवाळीला नातेवाईकांना भेट देता येईल असे विमा गिफ्ट कार्ड कंपन्यांनी सादर केले आहे. प्रिपेड कार्डसारखे असणारे हे कार्ड ५०० आणि १,००० रुपयांच्या पटीत उपलब्ध आहे. १० टक्के सवलतीत ते खरेदी करता येईल. त्याची वैधता सहा महिने आहे. या कार्डचा उपयोग करून धारकाला विमाछत्र प्राप्त करता येणार आहे. अशा व्यावसायिक योजनांचीही दिवाळी भेटवस्तूंमध्ये यंदा चलती राहिली.

Post a Comment

Previous Post Next Post