चिरोटे करता येत नाहीत? मग जाणून घ्या त्याची अचूक कृती

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सगळीकडे खरेदीची, फराळ करण्याची लगबग सुरु झाली आहे. घरातील स्त्रीयादेखील फराळ करण्याची पूर्वतयारी करताना दिसत आहेत. दिवाळी म्हटलं की चकली, चिवडा, लाडू या पदार्थांनी भरलेलं ताट डोळ्यासमोर येतं. खरं तर दिवाळीच्या फराळामध्ये लाडू, करंज्यांशिवाय अन्य अनेक पदार्थ केले जातात. मात्र, सध्याच्या काळात हे पदार्थ आता लुप्त होताना दिसत आहेत. यातलाच एक पदार्थ म्हणजे चिरोटे.

पूर्वी प्रत्येक घरात सणावाराला चिरोटे आवर्जुन केले जात. चिरोटे हे साध्या किंवा पाकातले अशा दोन पद्धतीने केले जातात. यात दिवाळीसाठी करण्यात येणारे साधे गोडाचे चिरोटे कसे करायचे हे पाहुयात.

साहित्य :
रवा - १ वाटी
मैदा - अर्धा ते पाऊण वाटी
तूप
तेल
तांदूळाचं पीठ - अर्धा वाटी
पीठीसाखर

कृती :
रवा व मैदा एकत्र करुन त्यात तेलाचं मोहन घालून चांगलं एकत्र करुन घ्यावं. त्यानंतर हे पीठ घट्ट भिजवून घ्या. हाताला तेल लावून या पीठाचे लहान लहान गोळे तयार करा. दुसरीकडे तांदळाची पिठी अर्धी वाटी व दोन चमचे घट्ट तूप एकत्र करून चांगले एकजीव करावे. हे मिश्रण हलके व्हायला हवे. त्यानंतर पिठापासून केलेले गोळे घ्या. यात एका गोळ्याची पातळ पुरी लाटून त्यावर तांदळाची पिठी-तूपाच्या मिश्रणाचा थर लावा. पुन्हा त्यावर एक लाटलेली पुरी ठेवा. तुम्हाला हवे तेवढे थर लावा. त्यानंतर मंद गॅसवर हलक्या हाताने या पुऱ्या तळून घ्या. सगळ्या पुऱ्या तळून झाल्यानंतर त्यावर पिठीसाखर तुमच्या आवडीप्रमाणे भूरभूरवा.

Post a Comment

Previous Post Next Post