जीममध्ये जायला वेळ नाही? मग घरीच करा ‘ही’ सहजसोपी योगासने

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपआपल्या कामात व्यस्त असतो. त्यामुळे ऑफिस, घर, कुटुंब या जबाबदारी पार पाडत असताना अनेकांचं त्यांच्या फिटनेसकडे दुर्लक्ष होतं. परिणामी, त्याचा आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर थेट परिणाम होत असतो. लठ्पणा, नैराश्य असे आजार हळूहळू जाणवायला लागतात. परंतु, या धकाधकीच्या जीवनात दररोज जीममध्ये जाणं प्रत्येकालाच जमत असतं नाही. त्यामुळे असे काही योग प्रकार आहेत, जे घरी राहून ही करता येऊ शकतात. ‘द योगा इन्स्टिट्यूट’च्या संचालिका डॉ. हंसाजी जयदेव योगेंद्र यांनी घरच्या घरी करता येणारी काही योगासने सांगितली आहेत.

१. भुजंगासन
हे मागच्या बाजूने वळत करण्याचे आसन आहे. या आसनामुळे तणाव व थकवा दूर होतो. घरातील काम केल्यानंतर होणाऱ्या पाठदुखीवर भुजंगासन हा रामबाण उपाय आहे. या आसनामुळे पाठीला आराम मिळतो. पोटाच्या बाजूने जमिनीवर झोपा आणि हात जमिनीवर ठेवा. हात कोप-यामध्ये वाकवत छातीच्या बाजूला जमिनीला स्पर्श करत ठेवा. श्वास घेत शरीराचा डोके व मानेपर्यंतचा भाग कमरेपर्यंत वर उचलत वरच्या दिशेने पाहा आणि हे करत असताना पाय एकमेकांना जुळवून ठेवा. ६ सेकंदांपर्यंत या स्थितीमध्ये राहा आणि त्यानंतर हळूहळू मूळ स्थितीमध्ये या.

२. सर्वांगासन
दिवसभर उभं राहून कामं केल्यामुळे शरीराचा संपूर्ण भार पायांवर येतो.त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी हा योगप्रकार फायदेशीर आहे. तसंच या आसनामुळे मन देखील स्थिर होते. हे आसन करण्यासाठी प्रथम पाय एकमेकांना जुळवत हात बाजूने ताठ ठेवत पाठीच्या बाजूने झोपा. गुडघे, पाय कमरेच्या भागापर्यंत वाकवा. हाताच्या साहाय्याने कमरेचा भाग धरा आणि श्वास सोडत पाय वरच्या बाजूने उचला. असे करत असताना गुडघे वाकलेल्या स्थितीत म्हणजेच कोनाच्या आकाराप्रमाणे ठेवा. हळूहळू पाय सरळ करा आणि पायाची बोटे वरच्या बाजूने धरा. गुडघा देखील सरळ ठेवा. पाठीच्या कणाला आधार देण्यासाठी हाताचा वापर करा. हनुवटी व तोंडाचा भाग जमीन समांतर सरळ ठेवा. ही स्थिती १० ते १२ सेकंदांपर्यंत ठेवा आणि विरुद्ध क्रिया करत हळूहळू मूळ स्थितीमध्ये या.

३. यास्तिकासन
यास्तिकासन केल्यामुळे शरीरातील सर्व स्नायू ताणले जातात. यात स्नायूंमधील ऊती, तसेच अवयव ताणले जाऊन रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे हे आसन महिलांसाठी फायदेशीर आहे. हे आसन करताना प्रथम पाठीवर झोपा व पाय एकमेकांना जोडून घ्या. त्यानंतर श्वास घेत हात डोक्याच्या बाजूने वर घ्या आणि हाताचे तळवे जमिनीवर टेकवा. ज्यामुळे शरीरातील स्नायू ताणले जातील.श्वासोच्छवास करत ५ ते ६ सेकंदांपर्यंत याच स्थितीमध्ये राहा आणि त्यानंतर पुन्हा मूळ स्थितीमध्ये या.

Post a Comment

Previous Post Next Post