वयाची तिशी उलटली आहे? मग हे पदार्थ ठरू शकतील हानिकारक


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वयाची तिशी उलटली की, माणसाच्या शरीरात काही बदल होऊ लागतात. वयाच्या विशीत असलेला जोम कमी होऊ लागतो. स्त्री आणि पुरुष अशा दोघांच्या शरीरात काही बदल घडतात, ज्यांमुळे तंदुरुस्त राहणं एक आव्हान बनतं. हार्मोनल बदलांमुळे शरीरावर परिणाम होतो. पण, वाढत्या वयात शारीरिक त्रास होण्याला आहार हा पुष्कळअंशी जबाबदार असतो.

तुमच्या आहारात किती पौष्टिक गोष्टींचा समावेश करता, त्यावर तुमचं तिशीनंतरचं आयुष्य किती तंदुरुस्त राहील, ते अवलंबून असतं. त्यामुळे तुमची तिशी उलटली असेल किंवा तुम्ही त्या उंबरठ्यावर असाल तर हे पदार्थ तुम्ही आहारात कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत किंवा संपूर्णतः बंद केले पाहिजेत.

सोडियम
सोडियम हा रोजच्या अन्नातून आपल्या शरीरात जाणारा एक मुख्य घटक आहे. एका माणसाला एका दिवसात तब्बल 2300 मिलिग्रॅम इतकंच सोडियम गरजेचं असतं. फास्टफू़ड, चिप्स, मिठाचं अतिरिक्त प्रमाण असलेले अन्नपदार्थ अशा पदार्थांतून सोडियम अधिक प्रमाणात पोटात जातं. अधिक सोडियम घेतल्याने रक्तदाबासारखे दीर्घकालीन आजार जडू शकतात.

ग्लूकोज आणि कर्बोदके
वयाची तिशी उलटल्यानंतर साखर आणि कर्बोदकांच्या प्रमाणावर आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. वयानुसार माणसाची झोप कमी होते. त्यामुळे तो दिवसभरात साखर आणि कर्बोदकांचं सेवन अधिक करू लागतो. याचा एकत्रित परिणाम म्हणजे माणसाचं वजन वाढतं आणि नंतर आरोग्याचे इतर त्रास भेडसावू लागतात.

कॅफिनयुक्त द्रव्ये
दिवसभर आपली त्वचा जर अतिनील किरणांच्या संपर्कात आली असेल, तर त्वचेचं नुकसान होतं. अर्थात रात्री झोपल्यानंतर शरीरातील काही पेशी ती झीज आणि नुकसान भरून काढतात. पण, कॅफिनयुक्त द्रव्ये आपल्या झोपेच्या प्रक्रियेत अडथळा आणतात आणि त्यामुळे आपल्या झोपेदरम्यान काम करणाऱ्या पेशी आपल्या त्वचेचं नुकसान भरून काढू शकत नाहीत. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचेचा पोत बिघडणे अशा समस्या भेडसावू शकतात.

तळलेले, पचायला जड असलेले पदार्थ
तिशीनंतर बऱ्याचदा व्यायामाची नियमितता राहत नाही आणि पाचनशक्तीही कमी होते. त्यामुळे अति तेलकट, पचायला जड, मैद्याचे पदार्थ किंवा जंकफू़ड पचवणं शक्य नसतं. त्यामुळे त्याचा थेट परिणाम तुमचे केस, त्वचा आणि शरीराच्या अन्य अवयवांवरही दिसू लागतो.

अल्कोहोल
तिशीनंतर माणसाचे यकृत, किडनी असे अवयव धीम्या गतीने काम करू लागतात. त्यामुळेच तिशीनंतर या दोन अवयवांशी निगडीत समस्या अधिक प्रमाणात दिसतात. अल्कोहोल तुमच्या शरीराच्या या दोन अवयवांवर थेट परिणाम करतं. त्यामुळे दारूचं सेवन पूर्णपणे थांबवणंच योग्य असतं. तसंच अल्कोहोलच्या अतिसेवनाने जाडेपणा, मधुमेह आणि इतर दीर्घकालीन आजार संभवतात.

मांसाहार
तुम्ही मांसप्रेमी असाल तर तुम्हालाही थोडं सावध राहावं लागेल. कारण, मांस सेवन केल्यानंतर ते पचायला जड असतं. शिवाय त्यात वापरलेले मसाले, तेल इत्यादीही तुमच्या शरीराला पचवावे लागतात. त्यामुळे मांसाहारवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे.

रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट (अधिक चरबी असलेले) यांपासून दूरच राहणं कधीही चांगलं ठरेल. त्याऐवजी तुम्ही बॉईल्ड व्हाईट मीट किंवा मासे खाण्याचा पर्याय निवडू शकता.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post