'राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक, त्यांचे शोषण तातडीने थांबवा'

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. त्यात दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात नुकतीच घडली आहे. माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकल्याचं समोर आलं आहे. यावरून आता राज्य सरकारला भाजपाकडून धारेवर धरलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक, त्यांचे शोषण तातडीने थांबवण्याबाबत. मागील तीन महिन्यांचे वेतन नाही, कामगार कपातीमुळे भविष्याच्या निर्माण झालेल्या समस्या, त्यांच्या जीवनातील अनिश्चितता याकडे लक्ष देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्य महामार्ग परिवहन सेवेतील(एसटी) कर्मचाऱ्यांची सध्या परवड सुरू आहे. हे सर्व कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तीन ते चार महिन्यांपासून काही महिन्यांचे आंशिक वेतन त्यांना प्राप्त झाले. जूनचे तर वेतनच अद्याप प्राप्त झालेले नाही.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे २५ टक्के वेतन अजून मिळालेले नाही, मे महिन्याचे ५० टक्के वेतन अजून मिळालेले नाही, तर जून महिन्याचे १०० टक्के वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांवर आपल्या अर्थार्जनासाठी भाजीपाला विकणे, गवंड काम करण्याची वेळ आली आहे. एसटीच्या लाखावर कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सध्या अतिशय अस्थिर मानसिकतेत जीवन जगत आहेत. एकीकडे वेतन नाही व दुसरीकडे भविष्यात आपल्या नोकऱ्या तरी टिकणार का? ही चिंता त्यांना सतावत आहे. दुष्काळी भागातील ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना आपण २०१९ मध्ये एसटीच्या सेवेते सामावून घेतले, त्यातील हजार ५०० जणांना घरी बसवण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांना सेवेवर येऊ नये, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्याचाही घाट घातला जात आहे. असे करताना कुठल्याही संघटनांना विश्वासात घेतले गेले नाही, हे तर आणखी दुर्देवी आहे.

तसेच, एसटी कर्मचाऱ्यांपैकी ३२८ कर्मचारी करोनाबाधित झाले त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला. ते सुद्धा या काळात करोना वॉरिअर्सप्रमाणे सेवा देत असल्याने त्यांच्याही समस्यांकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारने करोना बळींना ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तथापी मृत्यू झालेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. एसटी ही ग्रामीण परिवहनाचा आत्मा आहे. या समस्यांकडे आपण तातडीने लक्ष द्यावे, ही माझी विनंती आहे. असंही फडणवीस यांनी पत्रात सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post