सणासुदीत ‘हे’ पदार्थ टाळा.. आरोग्य सांभाळा..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवाळीसारख्या सणांमध्ये खवय्यांची चंगळ असते. या सणात सर्व पदार्थांची चव चाखता येते. मिठाईपासून ते चिव़डा, चॉकलेटपर्यंत सर्व पदार्थांची रलेचेल असते. मात्र, सणामध्ये खाण्याचा आस्वाद घेताना आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा दिवाळीनंतर मधुमेह, घशात खवखव, पोटदुखी असे त्रास होतात. त्यामुळे या आजारांनादूर ठेवत तंदुरुस्त राहायचे असल्यास आहारात काही गोष्टी टाळण्याची गरज आहे.

दिवाळीत तळलेल्या आणि तेला-तूपाचा सढळ हाताने वापर केलेले अनेक पदार्थ समोर येतात. मात्र, या पदार्थांचे अतिसेवन आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यामुळे तळलेल्या पदार्थांचा कमी प्रमाणात वापर करावा. तेल आणि तूप जास्त असलेले पदार्थही टाळावेत. अशा पदार्थांमुळे शरीरात मेद वाढतो. त्यामुळे वजन वाढून स्थूलता येते. त्यामुळे इतर आजारांना निमंत्रण मिळते.

मिठाईशिवाय सण साजरा होतच नाही. मात्र, मिठाई प्रमाणातच घ्यावी, तसेच साखरेऐवजी गुळ,अंजीर, खजूर ,केसर यांचा वापर केलेली मिठाई घ्यावी. घरी मिठाई बनवतानाही साखरेचा कमीतकमी वापर करावा. त्यामुळे अशी मिठाई आरोग्याला फायदेशीर असते. मिठाईसोबतच सणांना चॉकलेट आणि त्याचे विविध पदार्थ देण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र, मिठाई आणि चॉकलेट वजन आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवत असल्याने त्याचा कमी वापर करावा. डार्क चॉकलेट अँटीऑक्सीडेंट असल्याने ते घेतल्यास आरोग्याला अपाय होत नाही.

चकली, चिवडा, शंकरपाळे असे कुरकरीत पदार्थही या सणाची रंगत वाढवतात. मात्र, हे पदार्थ तेलकट असून त्यात मीठाचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे अशा पदार्थांऐवजी सुका मेवा वापरल्यास शरीराला फायदा होतो. शरीराला आवश्यक ते घटकही मेव्यातून मिळतात. तसेच सणाच्या काळात फळांचा वापर केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगांपासून संरक्षण होते.

सणांच्या काळात बाहेरील मिठाईऐवजी घरी बनवलेली मिठाई असल्यास त्याचा त्रास होत नाही. तसेच साखरेऐवजी गूळ किंवा इतर पादर्थ वापरता येतात. सुका मेवा वापरून त्याचा स्वादही वढवता येतो. घरच्याघरी अनेक गोड पदार्थ बनवता येतात. त्यात गरजेप्रमाणे साखर, मीठ वापरता येते. मात्र, याकाळात अतिसाखर असलेले, तळलेले पदार्थ टाळणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Post a Comment

Previous Post Next Post