विखे पिता-पुत्राविरोधात पुण्यात उपोषण आंदोलन; 'गणेश'चे निवृत्त कामगार झाले आक्रमक

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे युनिट-2 असलेल्या गणेश साखर कारखान्याच्या निवृत्त कामगारांनी शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात पुण्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे. गणेश कारखान्याच्या सुमारे १२५ कामगारांची निवृत्तीनंतरची ग्रॅज्युएटी व 52 महिन्यांचा थकित पगार मिळावा यासाठी पुणे येथील साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर (शिवाजीनगर-पुणे) येत्या १८ नोव्हेंबरला २७ निवृत्त कामगार उपोषण करणार आहेत, अशी माहिती सेवानिवृत्त कामगार रमेश देशमुख, सुभाष सांबारे, नारायण भुजबळ, कारभारी घोगळ, रामराव जाधव, गीताराम शेलार व अरुण तुपे यांनी दिली.
याबाबत माहिती देताना देशमुख म्हणाले, गणेश कारखान्याचे व्यवस्थापन २६ मे २०१४पासून पद्मश्री विखे कारखाना व्यवस्थापन पाहात आहे. खा. डॉ. सुजय विखे व आ. राधाकृष्ण विखे यांनी गणेश कारखान्याची ८७ कोटीची देणे रक्कम कबुल करूनही दिली नाही. निवृत्त कामगारांची ग्रॅच्युईटी, ५२ महिन्यांचा थकीत पगार, ५ वर्षांचा बोनस, वेतन मंडळ फरक अशी कोट्यवधीची देणी दिली गेलेली नाहीत. सव्वाशेवर निवृत्तांपैकी १०-१२जणांचे निधन झाले आहे व अन्य कामगारांवर आर्थिक संकट आले आहे. वृद्धत्वामुळे रक्तदाब, मधुमेह व अन्य आजार जडले असून, त्यांच्या उपचारांसाठीही पैसे नाहीत. त्यामुळे आमचे थकीत देणे तातडीने देण्याच्या मागणीसाठी २७ कामगार पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर १८पासून उपोषण आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात आमचे काही कमी-जास्त झाले तर त्याची जबाबदारी गणेश युनिट-२चे व्यवस्थापन, खा. डॉ. विखे व आ. विखे तसेच सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मृत्यूची वाट पाहता काय?
याबाबत देशमुख यांनी सांगितले की, या प्रश्‍नासंदर्भात 20/10/2020 रोजी नगर येथील प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयात आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी सुनावणीसाठी गेलो होतो. कामगार न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तीस दिवसात कारखाना व्यवस्थापनाने ग्रॅज्युएटी अदा करावी, अन्यथा 18 टक्के दर व्याजाप्रमाणे ती आम्हास मिळावी, अशी विनंती केली होती. आमच्या या प्रमुख मागण्यांसाठी अंदाजे 3 ते 5 वर्षे झालेले आहेत. वेळोवेळी लिखित व तोंडी स्वरुपात संबंधितांकडे यासंदर्भात मागणी केलेली आहे. परंतु अजून त्याची पूर्तता झालेली नाही. या संदर्भात साखर आयुक्त (पुणे) यांनी श्रीगणेश कारखाना यांना दिनांक 26/5/2014 पासून देणी रक्कम रु.87 कोटी लिखित स्वरुपात स्वीकारलेली असतानासुद्धा ती अद्यापपर्यंत कामगारांपर्यंत पोहचलेली नाही, त्यामुळे, या संदर्भात प्रादेशिक सहसंचालक साखर, अहमदनगर मिलिंद भालेराव यांना आम्ही सुनावणीमध्ये हा प्रश्‍न तातडीने मार्गी लागावा, अशी विनंती केली तेव्हा भालेराव यांनी ती धुडकावून लावून, तुम्ही नसला तरी तुमच्या वारसांना ग्रॅज्युएटी व थकित रक्कम मिळेल, अशा प्रकारची विचित्र भाषा वापरून आम्हाला नाउमेद केले. यामुळे शासकीय अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे शासन दरबारी आम्हाला न्याय मिळेल की नाही, याबाबत आम्हाला शंका वाटते. शासकीय अधिकारी आमच्या मरणाची वाट पाहात आहेत काय, असा उद्वेगजनक सवालही देशमुख यांनी केला. नगरच्या प्रादेशिक सहसंचालकांनी आमच्या मागण्यांचा विचार न केल्यामुळे आम्ही 18 नोव्हेंबरला पुण्यात साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post