नराधमांनी महिलेचे नाक, जीभ कापली

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लग्न करण्यास नकार दिल्याने नराधमांनी घरात घुसून एका विधवा महिलेचे नाक आणि जीभ कापली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. जैसलमेर जिल्ह्यातील संकडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सहा वर्षांपूर्वी गुड्डीचा कोजे खान याच्याशी विवाह झाला. मात्र, पाच वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. ही महिला 28 वर्षांची असून तिला 4 वर्षांचा मुलगा आहे. तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षे मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी तिचा पुर्नविवाह करण्यासाठी तिला बळजबरी करण्यात येत होती. गुड्डी आणि तिची आई घरी असताना साधारण 10 ते 15 जण त्यांच्या घरात घुसले. तलवार,काठ्या, बंदूक अशी हत्यारे घेऊन घरात शिरलेल्या या नराधमांनी तिची जीभ छाटली नाक कापले.

काही क्षणात या आरोपींनी बाईकवरून तिथून पळ काढला. त्यानंतर जखमी अवस्थेतील त्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची सासू तिला पुन्हा लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत होती, असे तिच्या भावाने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिकारी अजय सिंग अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post