ग्रामपंचायतींची 'रणधुमाळी' पुन्हा लटकली


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोनामुळे मागील ७-८ महिन्यांपासून अस्वस्थ असलेले राजकीय विश्व किमान गावपातळीवर ग्रामपंचायत निवडणुकांच्या चर्चेने अलर्ट झाले होते व गावा-गावातून उत्साहाने राजकीय हालचाली सुरू होत्या. पण त्यावर आता विरजण पडले आहे. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा जाहीर केलेला कार्यक्रम रद्द करून लांबणीवर टाकला आहे. त्यामुळे गावा-गावातील राजकीय तयारीवर विरजण पडले आहे व राजकीय चर्चाही थंडावू लागल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी नुकतीच दिली आहे. राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम मध्यंतरी जाहीर करण्यात आला होता. पण आता तो रद्द करण्यात आला आहे. तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी स्पष्ट केले आहे.

मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post