तमालपत्राचे हे फायदे वाचून तुम्हीही हैराण व्हाल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

विविध प्रकारचे मसाले हा भारतीय पाककलेमधला महत्त्वाचा घटक. हे मसाले खाद्यपदार्थाची लज्जत तर वाढवतातच पण स्वतंत्रपणे पाहिलं तर ते आरोग्याच्या दृष्टीनेही बहुगुणी आहेत. मसाल्याच्या पदार्थांमध्ये आवर्जुन वापर करण्यात येणारा पदार्थ म्हणजे तमालपत्र. विशिष्ट सुगंध असलेली ही पाने काही जण मुद्दाम तांदळात टाकून ठेवतात. खडा मसाला करताना, पूड करून किंवा काळ्या-गोडय़ा मसाल्यात ही पाने वापरली जातात. पोटात गॅसेस होणे टाळण्यासाठी जड पदार्थामध्ये तमालपत्र वापरली जातात. अपचनामुळे पोटात वायू साठून कळा येतात तेव्हा या पानांचे अर्धा चमचा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे. सर्दी, खोकला, घशाच्या तक्रारी, तापाची कणकण यावरही तमालपत्राचा चहा करून घ्यावा किंवा चूर्ण मधातून चाटावे.

तमालपत्राचा काढा (३-४ पाने, पेलाभर पाणी) मुखरोगांवरही फायदेशीर ठरतो. हिरडय़ांना येणारी सूज, तोंडात व गालाच्या आतील भागात येणारे फोड, दात व हिरडय़ांचे दुखणे यात या काढय़ाच्या गुळण्या कराव्या. काढा जमेल तेवढा वेळ तोंडात धरून ठेवावा. फायद्यासाठी दिवसातून ४-५ वेळा तरी हा प्रयोग करणे गरजेचे आहे.

साध्या आजारांवर मसाले वापरून घरच्या घरी करण्याचे हे उपाय आपली प्रकृती पाहून करणे गरजेचे आहे. प्रत्येकाची प्रकृती वेगळ्या प्रकारची असल्यामुळे सर्वाना हे उपाय एकाच प्रमाणात लागू पडतील असे सांगता येत नाही. मात्र प्रत्येक मसाल्याचे असलेले फायदे पाहून रोजच्या जेवणात त्यांचा अधिक समजून घेऊन वापर करावासा नक्कीच वाटेल.

(टीप : ही केवळ सर्वसामान्य माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारे अचूक उपचाराचा पर्याय नाही. त्यामुळे अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा अथवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

Post a Comment

Previous Post Next Post