सकाळी रिकाम्यापोटी कोथिंबीरीचे पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

प्रत्येकाच्या घरात कोथिंबीर असतेच. कोथिंबीरीने भाजीचा आणि डाळीचा स्वाद वाढत असल्याने आहारात त्याचा वापर होतो. तसेच चटणी बनवण्यासाठीही कोथिंबीरीचा वापर होतो. आहाराचा स्वाद वाढवणाऱ्या कोथिंबीरीत अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे याचा आहारत समावेश केल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो तसेच निरोगी राहण्यास मदत होते. कोथिंबीरीचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहेच. त्याचसोबत सकाळी रिकाम्यापोटी कोथिंबीरीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक रोगांवर हा रामबाण इलाज असल्याने याचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येतो.

कोथिंबीरीची पाने रात्रभर ग्लासभर पाण्यात भिजत ठेवावी. सकाळी पाने काढून ते पाणी गाळून प्यावे. त्याचप्रमाणे धण्याचेही पाणी बनवता येते. रात्री ग्लासभर पाण्यात धणे भिजवून ठेवावे. सकाळी धणे काढून गाळून ते पाणी प्यावे. या पाण्यात चवीसाठी लिंबू पिळूनही हे पाणी घेता येते. त्यामुळे लिंबाच्या रसाचेही फायदे शरीराला होतात. मात्र, हे पाणी रिकाम्यापोटी घेणे गरजेचे आहे.

सकाळी रिकाम्यापोटी कोथिंबीरीचे पाणी घेतल्याने पचनासंबंधीचा त्रास दूर होतो. याच्या सेवनाने जठरातील अग्नी नियंत्रणात येतो. त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होत नाही. तसेच पोटदुखी, जळजळ, गॅस यासारखे त्रासही दूर होतात. वजन कमी करण्यासाठीही कोथिंबीरीचे पाणी उपयोगी आहे. कोथिंबीरीमुळे शरीरातील अतिरिक्त मेद कमी होतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. या पाण्यात लिंबू घेतल्यास त्याचे आणखी फायदे दिसून येतात.

थायरॉइडची समस्या असल्यास त्यावर मात करण्यासाठीही कोथिंबीरीच्या पाण्याचा उपयोग होतो. कोथिंबीरीत अनेक प्रकारची खनिज द्रव्ये आणि विटामिन्स असतात. त्यामुळे थॉयरॉइड नियंत्रणात येण्यास मदत होते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी कोथिंबीरीचे पाणी घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. मात्र, ज्यांच्या शरीरात साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यांनी कोथिंबीरीचे पाणी घेऊ नये. शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठीही हे पाणी उपयोगी असते. हे पाणी नियमित घेतल्यास पोट साफ राहण्यास मदत होते. त्यामुळे कोथिंबीरीचा आहारात समावेश करण्यासोबतच सकाळी रिकाम्यापोटी कोथिंबीरीचे पाणी घेतल्यास त्याचे फायदे दिसून येतात. मात्र, हे पाणी घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post