हरभरा खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून व्हाल चकीत!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हिवाळा ऋतू सुरु झाला की बाजारात ऊस, संत्री, गाजर, हरभरा,आवळे अशी फळफळावर दिसू लागते. या सगळ्यामध्ये अनेकांचं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे हरभरा. हिरवागार हरभरा पाहिला की महिला वर्गाच्या डोक्यात अनेक वेगवेगळ्या भन्नाट रेसिपी घुमू लागतात. मग संपूर्ण हिवाळा ऋतू संपेपर्यंत ओल्या हरभऱ्याची चटणी, घावणं, पाल्याची भाजी असे वेगवेगळे प्रकार प्रत्येकाच्या स्वंयपाक घरात होऊ लागतात. या ओल्या हरभऱ्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. विशेष म्हणजे केवळ ओल्या हरभऱ्याचेच नव्हे, तर चणे किंवा हरभरा डाळीचं पीठ (चणा डाळीचं पीठ) हेदेखील शरीरासाठी बहुगुणी ठरत असल्याचं दिसून येतं.

१. हरभऱ्यामध्ये मॉलिक अॅसिड, ऑक्झालिक अॅसिड यांचं प्रमाण असल्यामुळे आम वांत्या (उलटी), अपचन या समस्या दूर होतात.

२. हरभरा स्नायूवर्धक आहे. त्यामुळे व्यायाम करणाऱ्यांनी हरभऱ्याचं नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरू शकतं.

३. ओल्या हरभराच्या पानांमध्ये लोहाचं पुरेपूर प्रमाण असतं. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता असलेल्या व्यक्तींनी हरभऱ्याच्या पानांची भाजी खावी.

४. कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार असल्यास हरभरा डाळीचे पीठ प्रभावी जागेवर लावावे.

५. डाळीच्या पीठाने रंग उजळतो.

६. चेहऱ्यावर मुरुम असतील तर एक चमचा दही घेऊन त्यात थोडसं डाळीचं पीठ घालावं. त्यानंतर हा लेप चेहऱ्यावर लावावा. यामुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.

७. केस रुक्ष किंवा कोरडे असतील तर डाळीच्या पीठाने केस धुवावेत.

८. सतत घाम येऊन शरीरातून दुर्गंधी येत असल्यास अंघोळ करताना डाळीच्या पीठाचा लेप लावावा.

‘या’ व्यक्तींनी हरभरा खाऊ नये

१. हरभरा डाळ पचण्यास जड आहे. तसंच ती उष्ण, तुरड-गोड चवीची आहे. त्यामुळे वातदोष वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच, वातप्रकृतीच्या व्यक्तींनी हरभरा डाळ किंवा हरभऱ्याचं सेवन करु नये.

२. हरभरा पचण्यास जड आहे. त्यामुळे पचनशक्ती मंद असणाऱ्यांनी किंवा अपचनाचा त्रास होणाऱ्यांनी हरभऱ्याचं सेवन टाळावं. तसंच डाळीच्या पीठापासून केलेले पदार्थ देखील जास्त खाऊ नये.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post