एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. डाळ, पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येते. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.
मेथी दाण्यांचा उपयोग वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. आयुर्वेदानुसार मेथीच्या दाण्यांमुळे कित्येक सौंदर्यवर्धक तसंच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. मेथीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आपले आजारांपासून संरक्षण होतं. मेथीमध्ये जास्त प्रमाणात फॉलिक अॅसिडचे घटक आहेत.
मधूमेहींनी मेथीचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते. तसेच मेथीमधील अमिनो असिड या घटकामुळे इन्शूलीनच्या निर्मितीस देखील चालना मिळते.
तापामध्येही मेथीचे दाणे गुणकारी आहेत. लिंबू रस, मध आणि मेथीचे दाणे याचं मिश्रण तापावर उत्तम चाटण आहे. तसंच, यामध्ये असणाऱ्या ‘म्युसिलेज’ या घटकामुळे घशाच्या दुखण्यावर आराम मिळतो.
मेथीमध्ये फायबर व अन्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात व पचनास मदत होते. कधीकधी अपचन अथवा पोटदुखी असल्यास मेथीचा चहा घेतल्यास आराम मिळतो. सकाळी उठल्यावर मेथीचा उकळलेला अर्क घेतल्यास बद्धकोष्ठतेमध्ये देखील फायदा होतो.
शिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कित्येक प्रकारच्या अन्य पोषक तत्त्वांचाही समावेश आहे. मेथीमुळे केस तुटणे तसंच केस गळतीची समस्या कमी होते. तसंच मेथी फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होतात. मेथीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट, अँटी रिंकल, मॉइश्चराइझिंग आणि त्वचा मऊ करण्यास उपयुक्त पोषण तत्त्वांचा समावेश आहे. या घटकांमुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
केसातील कोंडा कमी करण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्याची बारीक पेस्ट करा. हवं तर यामध्ये दही मिसळा. हे मिश्रण तुमच्या टाळूवर घासा. हा पॅक तीस मिनिटं ठेवल्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा.
वजन कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले मेथीचे दाणे सकाळी उपाशी पोटी चाऊन खा. मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात ज्यामुळे भूक कमी लागते. ज्यामुळे सहाजिकच तुम्हाला वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठता येते.
अपुरी झोप, ताणतणाव, सतत कम्प्युटरसमोर बसून डोळ्यांवर दुष्परिणाम होतात. यामुळे डोळे सूजणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. डार्क सर्कलमुळे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा येते. या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करा. दोन चमचे मेथी दाणे भिजत ठेवा. दाणे नीट भिजल्यानंतर ते दुधामध्ये वाटून घ्या. जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्ही आपल्या डोळ्यांखाली लावा आणि सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.
(कोरा या संकेतस्थळावर संकेत यांनी ही माहिती दिली आहे. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)
Post a Comment