हळद घालून कोमट पाणी प्यायल्यास ‘या’ शारीरिक तक्रारी होतील दूर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ऋतूमानानुसार वातावरणात अनेक बदल होत असतात. त्यामुळे सहाजिकच सतत वातावण बदलल्यामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेक वेळा लहान लहान शारीरिक तक्रारी डोकं वर काढत असतात. यात काही समस्या लहान असतात परंतु त्या प्रचंड त्रासदायक ठरतात. उदाहरणार्थ, सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा अनेक लहान समस्या असतात. परंतु, काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर या समस्या नक्कीच दूर होतील. यात सकाळी उठल्यावर अनेक जण गरम पाणी पितात. परंतु, जर गरम पाण्यात हळद घातली तर त्याचे अनेक गुणकारी फायदे पाहायला मिळतील. चला तर मग पाहुयात हळद घालून कोमट पाणी पिण्याचे फायदे.

१. घसा खवखवत असल्यास आराम मिळतो
अनेक वेळा सर्दी होण्यापूर्वी घसा खवखवतो किंवा दुखतो अशा वेळी चिमुटभर हळद घातलेलं कोमट पाणी प्यायल्यास घशाला शेक मिळतो आणि त्रास कमी होतो.

२. अन्नपचन होते
बहुगुणी हळद ही अन्नपचन करण्यास फायदेशीर ठरते. हळदीमुळे पित्तरसाची निर्मिती होते. या पित्तरसामुळे अन्नपचन चांगल्या प्रकारे होते. तसंच सध्याची तरुणाई जंकफूड जास्त प्रमाणात खाते. त्यामुळे अशा वेळा सकाळी उठल्यावर रोज कोमट पाण्यात हळद टाकून प्यावी.

३. साखरेची पातळी नियंत्रणात
हळदीमुळे शरीरातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण राहण्यास मदत होते. मधुमेह असणाऱ्यांनी रोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद प्यायल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४. सूज कमी करण्यास मदत
अनेकांना विविध कारणांनी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना सूज येते. हळदीमध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्यांना अर्थायटीससारख्या समस्या असतील त्यांनी न चुकता सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि हळद घ्यायलाच हवे.

५. चेहरा उजळण्यास मदत
हळद ही त्वचेसाठीही उत्तम औषध आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास तसेच शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा उजळण्यास आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होते.

६. प्रतिकारशक्ती वाढते
कोणत्याही आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post