या आजारांवर दोडका ठरतो रामबाण औषध; जाणून घ्या फायदे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दोडका, शिराळे, कोशातकी या विविध नावांनी ओळखला जातो. फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा. आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.

आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळय़ाप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे. अरुची, खोकला, कप, कृमी व ताप या विकारात दोडका पथ्यकर पालेभाजी आहे. कृश व्यक्तींना वजन वाढविण्याकरिता दोडका उपयुक्त आहे. दोडक्याच्या मुळांचा उपयोग मूतखडा पडून जाण्याकरिता होतो.

पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते, कारण त्यात फॅट खूपच कमी असते आणि कॅलरीज जवळजवळ नसतातच. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आणि यकृताच्या आरोग्यासाठी दोडका उपयुक्त आहे. दोडक्याच्या सेवनाने मूळव्याध आणि मलावरोध या दोन्ही व्याधीत फायदा होतो. दोडक्याची सालं म्हणजे शिरा फेकू नयेत. कोवळ्या असतील तर बारीक चिरून, शिजवून भाजी करावी किंवा परतून चटणी करावी. नाहीतर एका दोडक्याची सालं आणि एक टोमॅटो उकडून मिक्सरमधून काढून गाळावं आणि त्याचं सार किंवा सूप करावं. आमांश, जुलाब, मंदाग्नी, पोटदुखी या विकारात रुग्णांनी दोडका टाळावा. दोडक्याच्या शिरांची किसून तीळ मिसळून फोडणी देऊन चटणी करावी. दोन घास अन्न जास्त जाते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post