दुर्वा या वनस्पतीचा आरोग्यासाठी काय फायदा होतो?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आपल्याकडे गणपतीपूजनाच्या साहित्यामध्ये दुर्वांचा समावेश अतिशय महत्वाचा आहे. दुर्वांना आयुर्वेदामध्ये महाऔषधीचे स्थान दिले गेले आहे. अनेक पौष्टिक आणि औषधी गुणांनी युक्त दुर्वांचा उपयोग हिंदू धर्मामध्ये पूजा पाठासाठी तर होतोच, पण त्याशिवाय या दिव्य औषधीमध्ये यौनरोग, लिव्हरशी निगडीत आजार, बद्धकोष्ठ या व्याधी बऱ्या करण्याची क्षमता आहे.

आयुर्वेदाप्रमाणे दुर्वांची मुळे, देठ आणि पाने या सर्वांचाच उपयोग अनेक व्याधींना बरे करण्यासाठी केला जाऊ शकतो. दुर्वांची चव काहीशी गोडसर असून, यामध्ये प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, फायबर आणि पोटॅशियम आहेत. ही सर्व तत्वे निरनिराळ्या प्रकारच्या पित्तांवर अन बद्धकोष्ठावर गुणकारी आहेत. पोटाशी निगडीत व्याधी, यौनरोग, आणि लिव्हरशी निगडीत विकारांवर देखील दुर्वा गुणकारी आहेत.

ज्यांना काही कारणाने डोकेदुखीचा त्रास होत असेल, त्यांनी दुर्वा आणि चुना समप्रमाणामध्ये घेऊन पाण्याच्या मदतीने बारीक वाटून घ्यावा, आणि हा लेप कपाळावर द्यावा. त्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर ज्यांच्या डोळ्यांवर काही कारणाने सतत चिकटा रहात असेल, किवा डोळ्यांमधून घाण येत असेल, त्यांनी दुर्वा पाण्यासोबत बारीक वाटून घेऊन ही पेस्ट एका मऊ कपड्यामध्ये बांधावी व हा कपडा डोळ्यांवर ठेवावा. डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे सतत लाल असणे अश्या नेत्राव्याधींवर ही दुर्वांचा लेप गुणकारी आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त उष्णतेमुळे अनेकदा नाकातून रक्त येते. अश्या वेळी दुर्वांच्या रसाचे काही थेंब नाकामध्ये सोडल्याने नाकातून रक्त येणे बंद होते. तसेच तोंड आले असल्यास किंवा तोंडामध्ये फोड आले असल्यास दुर्वांचा रस पाण्यामध्ये मिसळून या पाण्याने चुळा भरल्याने आराम पडतो. उलट्या होत असल्यास एक लहान चमचा दुर्वांचा रस पाजल्याने आराम मिळतो. जर अतिसाराची जुनी व्याधी असेल, तर दुर्वांच्या रसाच्या सेवनाने फायदा होतो. पोट बिघडून वारंवार जुलाब होत असतील, तर पाण्यामध्ये बडीशेप, सुंठ आणि दुर्वा एकत्र उकळी घेऊन हे पाणी पिण्यास द्यावे. त्याने जुलाब कमी होण्यास मदत मिळेल.

(कोरा या संकेतस्थळावर मोहन पाटील यांनी ही माहिती दिली आहे. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post