'हर्निया' काय प्रकार आहे?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आपल्यापैकी सर्वांनीच कधी ना कधी कोणाला तरी हर्निया झाला आहे किंवा एखाद्याचं हर्नियाचं ऑपरेशन झाल्याचं ऐकलं असेल. हर्नियाचा त्रास दहापैकी एका व्यक्तीला होत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं निरीक्षण आहे. वारंवार कानावर पडणाऱ्या या शब्दाचा नेमका अर्थ काय किंवा हा आजार नेमका कशामुळे व कसा होतो, याबाबत मात्र आपल्याला फारशी माहिती नसते. वर वर साधा दिसणारा हा आजार कधी जीवघेणा ठरेल, हेसुद्धा कोणी सांगू शकत नाही.

अगदी सोप्या शब्दात सांगायचं, तर आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर बनतात आणि सततच्या खोकल्यामुळे किंवा लघवी व बद्धकोष्ठतेमुळे जोर करावा लागल्यामुळे हर्निया होतो. हर्निया होतो, म्हणजे आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो.

हर्निया म्हणजे आंत्रगळ किंवा आंत्रवृद्धी किंवा अंत्रनिःसरण. पोटातील कमजोर स्नायूंमुळे निर्माण झालेल्या पोकळीत आतडी ओढली जाते. त्यामुळे पोट फुगतं किंवा छोटा-मोठ्या आकाराचा फुगवटा दिसायला लागतो आणि पोट दुखायला लागतं. हर्निया पुरुष, स्त्रिया तसंच कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला होऊ शकतो. हर्नियाची लक्षणं किरकोळ वाटली, तरी ती कधीही आढळू शकतात. बालकांमध्ये आढळणारा डांग्या खोकला, सज्ञान व्यक्तींमध्ये असलेला दमा, धूम्रपानामुळे येणारा खोकला तसंच अतिजड वस्तू, वजन उचलल्यामुळे हर्निया होतो.

हर्नियाकडे दुर्लक्ष केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. अचानक आतडं अडकल्यामुळे जिवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. अचानक मोठ्या झालेल्या हर्नियामुळे त्यात अडकलेल्या आतड्याचं गँगरीनही होऊ शकतं.

स्त्रियांमधील हर्निया
गरोदर स्त्रियांची सिझेरियन पद्धतीनं झालेली शस्त्रक्रिया किंवा कुटुंबनियोजनाच्या टाक्यांच्या शस्त्रक्रियेतील व्रणातून हर्निया होतो. आडव्या छेदातून शस्त्रक्रिया होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे आता अशा प्रकारे होणाऱ्या हर्नियाचं प्रमाण कमी झालं आहे. गरोदर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा ताण पोटांच्या स्नायूवर पडतो. त्यामुळे ते कमजोर बनतात. पोटावर जास्तीची चरबी निर्माण झाल्यास पोटात पोकळी निर्माण होते आणि आतडी बाहेर येते.

बालकांमधील हर्निया
लहान मुलांच्या बेंबीमध्ये नाळ चिकटलेल्या ठिकाणचे स्नायू कमजोर असतात. लहान मूल रडताना बऱ्याचवेळा बेंबी फुगलेली दिसते. हे लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. अनेकदा वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत बालकांमधील हर्निया बरा होतो.

पुरुषांमधील हर्निया
पोटातील आतडी त्या भागाच्या वर असलेल्या मेदाच्या आवरणासहित स्नायूंमधून बाहेर येण्याचं प्रकार पुरुषांमध्ये अधिक आढळून येतात. पोटाचे स्नायू जन्मतः कमजोर असल्यास उतारवयात जांघेत हर्नियाचा फुगा तयार होतो. या प्रकाराला प्रत्यक्ष हर्निया असं संबोधलं जातं. तरुण मुलांमध्ये अप्रत्यक्ष जांघेचा (इन्ग्विनल) हर्निया मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जांघेच्या वरच्या बाजूला हा हर्निया निर्माण झालेला असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास वीर्योत्पादक ग्रंथीतील रक्तस्रावावर परिणाम होऊ शकतो.

(कोरा या संकेतस्थळावर विकास शुक्ल यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post