लहान मुलांच्या दातांची घ्या ‘ही’ काळजी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लहान बाळांना दात येतांना त्यांना बऱ्याच वेळा त्रास होतो. त्यामुळे बाळाचे दात येण्यापूर्वी त्यांच्या हिरड्या मजबूत असणं गरजेचं आहे. तसंच त्यांची स्वच्छतादेखील करणं गरजेचं आहे. हिरड्यांचे आरोग्य चांगले रहावे याकरिता विशेष काळजी घेणे गरजेचं आहे. दुधाचे दात हिरड्यांमधून बाहेर येण्याची प्रक्रिया सहा महिन्यांनंतर सुरू होते. सुरूवातीला सुळे दात (२), दाढा (२) व चार दात येतात. त्यानंतर प्रत्येक सहा महिन्याला चार दात येतात.

दुधाचे दात हे फक्त खाण्यासाठी व चावण्यासाठीच नव्हे तर बोलण्यासाठी व शब्द उच्चारणासाठीसुद्धा मदत करतात. अगदी लहान बाळाला दात नसताना, दूध पाजल्यावर बाळाच्या हिरड्या स्वच्छ ओल्या कपड्याने साफ केल्या पाहिजेत तरच हिरड्या स्वच्छ राखण्यात मदत होईल. बाळाला दात येताना त्याला जुलाब होतात किंवा दूध पचत नाही असं म्हटलं जातं. मात्र यात काही तथ्य नाही. मुळात दात येत असताना बाळाच्या हिरड्या शिवशिवत असतात. त्यामुळे ते कोणतीही गोष्ट पटकन तोंडात टाकतात. त्यामुळे खेळणी, हातापायाची बोटं तोंडात गेल्यामुळे त्यांना जुलाब वगैरे होऊ शकतात. त्यामुळे बाळाला दात येताना आणि दात आल्यावर कोणती काळजी घ्यावी ते पाहू.

१. दूध पाजल्यानंतर बाळाच्या हिरड्या स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा.

२. लहान मुलांना दोन वेळा दात घासण्याची सवय लावावी.

३. वेळोवेळी दंतचिकित्सकांची भेट घेत मुलांच्या दातांची तपासणी करावी.

४. रात्रभर मुलांच्या तोंडात दुधाची बाटली ठेवू नये. त्यामुळे हिरड्यांना हानी पोहचते.

५. जेव्हा बाळ दुधाव्यतिरिक्त आहार घेण्यास सुरुवात करतं, त्यावेळी त्याच्या हिरड्यांची तसेच दातांची विशेष काळजी घ्यावी.

दरम्यान, लहान बाळांना दूध, फळाचा रस किंवा इतर काही गोड द्रव्य पदार्थ पाजण्यासाठी बऱ्याच वेळा बाटलीचा वापर होतो. रात्रीच्या वेळी अनेक पालक आपल्या बाळांना बाटलीत दूध किंवा ज्यूस घालून पाजतात व मुलं ती बाटली तोंडातच ठेवून झोपी जातात. असे केल्यास ते गोड पदार्थ रात्रभर बाळाच्या तोंडातील दातांवर साठून राहतात. तोंडातील जिवाणू याच गोड पदार्थांना आपला आहार म्हणून वापरतात, जिवाणू दातांवर हल्ला करून अम्लपदार्थ सोडतात ज्यामुळे दात कमजोर बनतात व किडू लागतात. हा प्रकार रोज घडल्याने दुधाचे दात पूर्णपणे नष्ट होतात. 

(टीप : कोणतेही उपचार वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय करु नये.)

Post a Comment

Previous Post Next Post