'जोतिबा'ची मालिका वादाच्या भोवऱ्यात; हिंदु जनजागृती समितीचा आक्षेप

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

टीव्हीवर सध्या सुरू असलेल्या 'दख्खनचा राजा जोतिबा' मालिकेत चुकीची माहिती दाखवून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याने निर्मात्यांवर कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक दस्तऐवजानुसार जोपर्यंत मालिका दाखवण्यात येत नाही, तोपर्यंत मालिकेवर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, श्रीजोतिबा देवस्थान कोट्यवधी हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रीजोतिबा देवतेवर आधारित 'दख्खनचा राजा जोतिबा' नावाने एक मालिका नुकतीच सुरू झाली आहे. या मालिकेच्या प्रक्षेपणापूर्वी पुजार्‍यांकडून योग्य माहिती घेतली जाईल, चुकीची माहिती दिली जाणार नाही, असा शब्द निर्माते महेश कोठारे यांनी दिला होता. प्रत्यक्षात 23 ऑक्टोबरपासून स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवर चालू झालेल्या या मालिकेत अनेक विपर्यास करणारे प्रसंग दाखवून खोटी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. या मालिकेमुळे अनेक भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि भक्तांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असा दावा घनवट यांनी केला आहे. त्यामुळे 'दख्खनचा राजा जोतिबा' मालिकेत चुकीची माहिती दाखवून भक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल कोठारे व्हिजन कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या मालिकेतील पुढील प्रत्येक भाग धार्मिक, ऐतिहासिक दस्तऐवज यांचा अभ्यास करूनच दाखवण्यात येतील, अशी लेखी हमी दिल्यावरच पुढील भागांचे प्रक्षेपण करण्यास अनुमती देण्यात यावी, तोपर्यंत मालिकेवर बंदी आणावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

घनवट याबाबत पुढे म्हणाले, ही मालिका 'केदार विजय' या ग्रंथावर आधारित असेल असे सांगण्यात आले होते. पण, प्रत्यक्षात पहिल्या भागापासून तसे दिसत नाही. कथेचा गोंधळ उडालेला असून 'यमाई', 'अंबाबाई', 'चोपडाई' यांच्या व्यक्तीरेखा लेखकाला समजल्या आहेत का, असा प्रश्‍न निर्माण होतो. रत्नासुराला अंबाबाईने कधी वरदान दिले? वाडी रत्नागिरी या डोंगराचे प्राचिन नाव मैनाकगिरी होते, याचा विसर लेखकाला पडलेला आहे. या मालिकेत श्रीजोतिबा देवाची भाषा ग्रामीण पद्धतीची दाखवली आहे आणि राक्षसांची भाषा शुद्ध दाखवली आहे. प्रत्यक्षात जोतिबा देवाने विद्याभ्यास केला होता. त्यामुळे देवाची भाषा शुद्ध हवी होती. देवाधिदेव दख्खनचा राजा अशी ज्यांची महती आहे, त्यांच्यासाठी मालिकेत वापरली जाणारी भाषा योग्य नसून ती देवांचा अपमान करणारी आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या चुकीच्या गोष्टी मालिकेत दाखवण्यात आल्या आहेत, त्याविषयी भाविकांची जाहीर क्षमा मागावी. यापुढे कोणत्याही देवता किंवा ऐतिहासिक विषयांवर मालिका बनवताना त्यातील संदर्भ व इतिहास योग्य आहे ना, याची पडताळणी केल्याशिवाय अशा मालिकांना मान्यता मिळू नये, यासाठी यंत्रणा उभारावी, अशीही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली, असे घनवट यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post