सौंदर्य खुलवण्यासाठी मुलतानी मातीचा असा करा वापर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

आपल्या चेहऱ्याची त्वचा नितळ आणि मुलायम असावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. विशेषत: मुलींमध्ये चेहरा चांगला दिसावा यासाठी विशेष प्रयत्न सुरु असलेले दिसतात. कधी चेहऱ्यावर येणारे पुरळ, डाग, कोरडेपणामुळे निघणारी स्कीन यांसारख्या समस्यांमुळे वैताग होतो. मग यावर नेमका कोणता उपाय करावा हे माहित नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण त्यामुळे ही समस्या आणखी वाढते. काहीजण चेहरा उजळण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचाही वापर करतात. तर काही जण पार्लरमध्ये जाणे पसंत करतात. पण भारतीय आयुर्वेदातील घटक असलेली मुलतानी माती चेहरा उजळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. तसेच चेहऱ्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही या मातीचा लेप फायदेशीर ठरतो. चेहरा कोरडा पडणाऱ्यांसाठी या टिप्स नक्कीच उपयुक्त ठरतात. बाजारात ही मुलतानी माती सहज उपलब्धही होते. पाहूया या मुलतानी मातीचा नेमका कसा उपयोग केल्यास त्याचा फायदा होतो.

मध आणि मुलतानी माती
मध हाही एक उत्तम आयुर्वेदीक पदार्थ असून तो आरोग्याच्या विविध समस्यांसाठी फायदेशीर असतो. १ चमचा मधात एक चमचा मुलतानी माती एकत्र करा. हा लेप चेहऱ्याला एकसारखा लावून तो २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. मग चेहऱ्याला एखादे मॉईश्चरायजर लावा. चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होण्यासाठी हा प्रयोग आठवड्यातून एकदा करा.

चंदन पावडर आणि मुलतानी माती
एक चमचा मुलतानी मातीमध्ये १ ते २ थेंब गुलाबपाणी घाला. त्यात अर्धा चमचा चंदन पावडर घाला. हे मिश्रण योग्य पद्धतीने एकत्र करुन ते चेहऱ्याला लावा. हा लेप २० मिनिटे ठेऊन कोमट पाण्याने चेहरा धुवा. चेहरा उजळ होण्यासाठी ही प्रक्रिया आठवड्यातून २ वेळा करावी.

दही आणि मुलतानी माती
एक चमचा दही आणि एक चमचा मुलतानी माती एकत्र करा. हा लेप चेहऱ्यावर लावून तो पूर्णपणे वाळू द्या. मग कोमट पाण्याने चेहरा धुवा. दह्यातील घटक चेहऱ्यासाठी उपयुक्त असतात. हे मिश्रण मुलतानी मातीमध्ये एकत्र केल्याने त्याचा चांगला फायदा होतो.

हळद आणि मुलतानी माती
हळदीलाही आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. पाव चमचा हळद, २ चमचे मध आणि १ चमचा मुलतानी माती एकत्र करा. हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा आणि मग चेहरा पाण्याने धुवा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post