एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
सोमवार असल्याने माशाचे कालवण करण्यास दिलेला नकार महिलेचा जीव घेऊन गेला. माशाचे कालवण केले नाही म्हणून गळा दाबून तिचा खून केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे ही घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की, ३ नोव्हेंबर रोजी गंगाबाई चव्हाण या ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. या घटनेने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली होती. परंतु या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली. सोमवार असल्याने माशाचे कालवण करण्यास पत्नीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या व्यसनी पतीने पत्नीचा गळा दाबून तिची हत्या केली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात बद्री चव्हाण (वय 50) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवार (दि. 2) रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या कुक्कडवेढे येथे गंगाबाई बद्री चव्हाण ही ४२ वर्षीय महिला पाच ते सहा दिवसांपूर्वी तिचा पती बद्री चव्हाण व त्यांचा मुलगा ऊस तोडणीसाठी आले होते. ते मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवाशी आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पतीची कसून झाडाझडती घेतली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे द्यायला लागल्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला, त्यानंतर त्या महिलेच्या खुनाला वाचा फुटली. गंगा ही सायंकाळी स्वयंपाक करण्याच्या तयारीत असताना तिचा पती तेथे आला व त्याने तिला माशाचे कालवण करण्यास सांगितले. पण सोमवार असल्याने तिने नकार दिला. त्यावरून त्या दोघात कडाक्याचे भांडण झाले. दरम्यान, पतीने गंगाला बाजूच्याच घनदाट झुडूपात नेऊन तिला गळा दाबून ठार मारले, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.
Post a Comment