दम असेल तर बॉलीवूड उत्तर प्रदेशात नेऊन दाखवा; ठाकरे आक्रमक


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
भारताच्या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके या मराठी माणसाने या कर्मभूमीत रोवली. ती चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेशला नेण्याचा विषय मध्यंतरी झाला. तुमच्यात दम असेल, तुमची क्षमता असेल तर खुशाल नेऊन दाखवा. त्याने काहीही फरक पडत नाही. त्यासाठी जो दर्जा असायला हवा तो दर्जा देण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते मी इथे देणार आहे. त्यासाठी अॅक्शन प्लान बनवा. दादासाहेब फाळके यांच्या या जन्मभूमीत फिल्म इंडस्ट्रीला काही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी चित्रपट निर्माते व कलाकारांना दिली.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत ’कॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक शब्दात भुमिका मांडली. ते म्हणाले की, माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आपल्या संदेशात म्हणाले फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्रात जन्माला आली. हो जर दादासाहेब फाळके यांनी या क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली नसती तर ती जन्माला आली असती की नसती, हाही प्रश्न आहे. त्यांनी निर्माण केलेली ही चित्रपटसृष्टी अधिक मजबूत करणे, हे महाराष्ट्र सरकारचे काम आहे. महाराष्ट्रात संस्कार, काैशल्य, मेहनत आणि जिद्द आहे. पण आजदेखील चित्रपट सृष्टीतील तंत्रज्ञानासाठी आपल्याला परदेशात जावे लागते. व्हिडिओ मिक्सिंगसारख्या तंत्रज्ञानासाठी लंडनला जावे लागते. हे सर्व आपल्याकडे व्हायला हवे, हे तंत्रज्ञान तसेच चित्रपटसृष्टीसाठी जी जागा आवश्यक आहे ते सर्व तुम्हाला इथे देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

या चर्चासत्राच्या दरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे या उपक्रमाचे काैतुक केले. मुंबई ही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असताना आजच्या काळात चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी ठोस सूचना मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्यासह मुख्य सचिव संजय कुमार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका मनीषा वर्मा, सहसंचालिका आंचल गोयल, निर्माते दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, निर्माते सिध्दार्थ रॉय कपूर, टी.पी.अग्रवाल. अभिनेते आदेश बांदेकर, अभिनेते सुबोध भावे, आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी चित्रपटांसाठी राखीव श
आज हिंदी आणि इतर भाषांबरोबरच मराठीतही उत्तम चित्रपट बनत असतात. पण काही वेळा एकाच दिवशी अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहातले शो (खेळ) मिळत नाही आणि पर्यायाने या चित्रपटांचे नुकसान होते. त्यामुळेच मराठी चित्रपटांसाठीही पुरेशा प्रमाणात शो राखीव ठेवण्याबाबत राज्य शासन आग्रही असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कलाकारांना बळ देणार
एखादं संकट असेल किंवा समस्या असेल तर आपण कलाकारांना साद घालतो. निवडणूक असो की कोरोनाचे संकट या संकटात संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकार नेहमी सहकार्य करतात. कारण जनमानसात कलाकारांची लोकप्रियता आणि त्यांच्या मनातील स्थान असते. त्यांच्या माध्यमातून संदेश तळागाळापर्यंत पोहोचतो. त्या कलाकारांच्या व्यथा आणि समस्या सोडवणे हे सरकार म्हणून आमचे काम आहे. या कलाकारांच्या पाठिशी राज्य शासन ठाम उभे आहे. कलाकारांना बळ देण्याचे काम हे सरकार करेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

चित्रपटसृष्टीचे महाराष्ट्रातील अग्रस्थान अधिक मजबूत करणार - अमित देशमुख
महाराष्ट्र चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे. या अनुषंगाने चित्रपट, मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण असावे या मुख्य उद्देशातूनच तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राचा उद्देश या क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रस्थान बळकट करणे, राज्यात चित्रपट निर्मिती आणि मनोरंजन माध्यम केंद्र प्रस्थापित करणे आणि या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

परवडणारी चित्रपटगृहे उभारणार
मनोरंजन क्षेत्र मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे काम करीत असते. क्षेत्रामुळे एक चांगला समाज घडण्यास मदत होत असते. सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. कारण समाजात जे आजूबाजूला घडत असते त्याचे प्रतिबिंब आपल्याला सिनेमातून पहायला मिळते. महाराष्ट्रात वेगवेगळया विषयावर बनत असलेल्या कलाकृती गावपातळीवर, खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी येणाऱया काळात महाराष्ट्रात ’परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्यशासन पुढाकार घेईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

अॅक्शन प्लॅन बनवा, प्राधान्यक्रम ठरवा
येणाऱया काळात महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या चित्रीकरणासाठी चांगली जागा विकसित करणे, नव नवीन तंत्रज्ञान आणणे यासाठी प्रयत्न केले जातील. मुंबईत असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचे येणाऱया काळात दर्जेन्नती करण्यावर भर असेल. यासाठी एक अॅक्शन प्लान तयार करा. कोरोनाचे संकट असल्याने अॅक्शन प्लान तयार करताना प्राधान्यक्रम ठरवा, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे काैतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post