पदवीधर व शिक्षक मतदारसंघात चुरस; महाविकास व भाजपमध्ये संघर्ष

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी व भाजप यांच्यात राजकीय संघर्ष यानिमित्ताने होत आहे. त्यात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

मंगळवारी (१ डिसेंबर) पाचही मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यानिमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर व अमरावती शिक्षक या पाच मतदारसंघांमध्ये राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये चुरस आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुका या संघटना पातळीवर लढविल्या जात असत; परंतु अलीकडे राजकीय पक्षांनी या निवडणुकांमध्ये अधिक रस घेतला असल्याने त्या चुरशीच्या होत आहेत. शिक्षक मतदारसंघांमध्ये शिक्षक संघटनांचे उमेदवार असत. या वेळी मात्र शिक्षक मतदारसंघांमध्येही राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.

औरंगाबादमध्ये माजी आमदार सतीश चव्हाण व भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात लढत होत आहे. नागपूरमध्ये भाजपचे संदीप जोशी विरुद्ध काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात लढत आहे. पुणे पदवीधरमध्ये भाजपचे संग्राम देशमुख विरुद्ध राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यात लढत होत आहे. आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र विरुद्ध भाजप अशी सरळ लढत प्रथमच होत आहे. करोनामुळे महानगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे या निवडणुकीच्या निमित्तानेच प्रथमच महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post