माहेरच्या साडीने त्यांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ज्यांना कोणी नातेवाईक नाहीत वा भाऊही नाही, अशा महिलांना मिळालेली माहेरची साडी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणून गेली. अनामिक भावांनी दिवाळीच्या भाऊबीजेनिमित्त दिलेली ही साडीची भेट आयुष्यभर स्मरणात राहील, अशी भावनाही यानिमित्ताने अनेकींनी व्यक्त केली. स्नेहालय संस्थेत शुक्रवारी हा आगळावेगळा उपक्रम झाला.

दिवाळीत आप्तस्वकीयांना व मित्रपरिवाराला भेटून भेटवस्तू, फराळाचे पदार्थ व मिठाई देण्याची परंपरा आहे. ज्यांना भाऊ आणि माहेर असते, अशा माता-भगिनींसाठी भाऊबीजेचा दिवस अगदी खास असतो. हमखास प्रेमाचे प्रतीक असणारे साडी वस्त्र आणि मिठाई त्यांना परंपरेने आपल्या भावाकडून दिली जाते. परंतु ज्यांना कोणीही भाऊ अथवा नातेवाईक नसतो, अशांसाठी दीपोत्सव निराशेचा असतो. अशा वंचित माता-भगिनींना सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजींच्या प्रेरणा आणि प्रयत्नातून माहेरची साडी भाऊबीज म्हणून शुक्रवारी दिली गेली. नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माता-भगिनी ही अनोखी भाऊबीज मिळाल्यावर अक्षरशः गहिवरल्या. ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नाही किंवा ओळखही नाही, असे भाऊ नवे नाते जोडण्यासाठी पुढे आल्याने कोणालाच अश्रू आवरले नाहीत. अनौपचारिक पद्धतीने भावपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित भगिनींतर्फे पल्लवी गायकवाड, रंजना रणनवरे, जया जोगदंड, मीना पाठक यांनी प्रातिनिधिक स्वरुपात महिलांच्या भावना व्यक्त केल्या. आपल्याला मिळालेली माहेरची साडी म्हणजे केवळ वस्त्र नसून जगण्याची उमेद आणि नवी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले.

मागील १५ वर्षापासून औटी गुरुजी माहेरच्या साडीचे अभियान दिवाळीत राबवितात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तसेच बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख, सदस्य प्रवीण मुत्याल, कोतवाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत भंगाळे, दिलासा सेलच्या महिला उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, सचिव ईश्वर बोरा, महानुभव पंथीय अनुयायी राजू कपाटे महाराज यांच्यासह मयुराज औटी, इंदिरा भालसिंग, स्नेहालय पालक किरीटी मोरे, अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर उपस्थित होते. स्नेहालय संस्थेतील तसेच कुटुंबाने नाकारलेल्या महिलांसाठी स्वतःचे योगदान तसेच मित्रांकडून ऐच्छिक मदत घेऊन गुरुजी साड्या आणतात. बाजारातील सुमारे ५०० रुपये सरासरी किमतीच्या साड्या विकत घेवून त्या भाऊबीजेच्या निमित्ताने अशा भगिनींना दिल्या जातात.

माहेरची साडी या उपक्रमात किरीटी मोरे, बलसेकर, प्रवीण बोरा, अशोक चांदणिया, कपाटे महाराज, मयुराज औटी, इंदिरा भालसिंग, जगदंबा साडी सेंटर आदी या ''भगिनींचे भाऊ'' उपस्थित होते. प्रास्तविक स्नेहालय संस्थेचे संस्थापक सदस्य गिरीश कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल अहिरे यांनी केले तर आभार मुत्याल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक बुरम, आकाश काळे, प्रवीण बुरम, अशोक चिंधे, संजय जिंदम, फिरोज पठाण, अंबादास शिंदे, मझहर खान, सविता करांडे, आशा जाधव आदींनी परिश्रम घेतले. साडेतीनशेवर महिलांना यावेळी माहेरची साडी दिली गेली.

Post a Comment

Previous Post Next Post