गुजरातला पाणी जाऊ देणार नाही; मंत्री भुजबळ यांनी केले सुतोवाच

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महाराष्ट्राच्या धरतीवर पडेल त्या पाण्याचा अधिकार महाराष्ट्राचा आहे. मात्र याठिकाणी डोंगर अधिक असल्याने हे पाणी गुजरातला वाहून जाते. यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आपण लढा देत आहोत. गुजरातमध्ये जाणारे हे पाणी गुजरातला जाऊ न देता हे पाणी महाराष्ट्रात वळविल्यानंतर नाशिक-नगर सह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे, असा दावा करून अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गुजरातला जाणारे महाराष्ट्रातील पाणी अडवण्याबाबत सुतोवाच शनिवारी कोपरगाव येथे केले.

कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात गोदावरी डावा तट कालवा सल्लागार समितीची बैठक त्यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी आमदार आशुतोष काळे, काळे सहकारी सहकारी साखर कारखान्याचे सुधाकर रोहम, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, पदमकांत कुदळे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थित होते. यावेळी भुजबळ पुढे म्हणाले, कालेश्वरम प्रकल्पाप्रमाणे गुजरातला जाणारे हे पाणी उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. सरकारला कर्ज काढण्याची वेळ आली तरी चालेल. मात्र, गुजरातला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रात वळविण्यासाठी प्रयत्न आहे. हे पाणी आल्यानंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठका घेण्याची गरज पडणार नाही. पाण्याचा साठा अधिक कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला तर प्रांता-प्रांतातील वाद संपुष्टात येतील. त्यासाठी वाहून जाणारे पाणी अडविण्याशिवाय पर्याय नाही. गेल्या पाच वर्षात कालव्याची दुरुस्ती न झाल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध असून विकास कामांचा बॅकलॉक भरून काढण्यात येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोना हद्दपार होत नाही, तोपर्यंत कोरोनाबाबत काळजी नागरिकांनी घ्यावी. दिवाळी आनंदात साजरी करावी. मात्र, या दिवाळीला जबाबदारीची किनार आहे, त्याचा नागरिकांनी आवश्य विचार करावा. २५ ते ३० हजार कोटी रुपये जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडून येणे बाकी आहे. हे अर्थचक्र आता पुन्हा सुरू होत असून हळूहळू सरकारच्या तिजोरीत पैसे येतील आणि नागरिकांची कामे होतील, असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, आवर्तन देण्याचा पूर्ण अधिकार स्थानिक आमदारांना देण्यात येत असून अभ्यास करून पाण्याचा वापर योग्य रितीने करून आवर्तने देण्यात यावी. कोपरगावच्या हक्काचे पाणी कोणीही नेणार नाही, आरक्षित पाणी पूर्ण क्षमतेने तुम्हाला मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले. यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगावमध्ये झाल्याने शेतकऱ्यांना आपले प्रश्न मांडता आले आहेत. गोदावरी कालव्याचे पश्चिमेकडील पाणी कोपरगाव पूर्वेकडे वळवावे, ही अनेक दिवसांची मागणी असून या मागणीचा शासन स्तरावर विचार करण्यात यावा. सध्या पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रब्बीचे आवर्तन न देता उन्हाळ्यात तीन रोटेशन देण्याचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Post a Comment

Previous Post Next Post