वीज बिल सवलत : मंत्री तनपुरे म्हणतात, 'ती' फक्त त्यांची इच्छा होती


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
वीज बिलात सवलतीचा विषय सध्या राज्यात गाजत असून, विरोधी पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी येथे महत्त्वाचा खुलासा केला. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर १०० युनिटपर्यंत वीज माफीची घोषणा केल्याच्या विषय़ावर स्पष्ट मत व्यक्त करताना तनपुरे म्हणाले, ''ती त्यांची फक्त इच्छा आहे, महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी सत्तेवर येताना ठरवलेल्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये या माफीचा विषय नाही. त्यामुळे मंत्री राऊत यांच्या त्या माफीच्या इच्छेबद्दल समिती नेमण्यात आली असून, त्या समितीचा अहवाल आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल'', असे स्पष्टीकरण मंत्री तनपुरेंनी दिले. तसेच कोरोना काळातील वीज बिल माफीबद्दल सुरू असलेल्या मागणी व आंदोलनांबद्दल बोलताना तनपुरे म्हणाले, ''या माफी वा सवलतीसंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे आहे व तो अजून शासनाने अमान्य केलेला नाही. मात्र, ग्राहकांनी वीज बिले भरलीच पाहिजे'', असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

महाविकास आघाडी सरकारने नव्याने मंजूर केलेल्या कृषी उर्जा धोरणाची माहिती मंत्री तनपुरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी वीज बिल माफीच्या दोन्ही मुद्यांचे स्पष्टीकरण त्यांनी केले. कृषी उर्जासंदर्भातील नव्या धोरणानुसार सुमारे १५ हजार कोटींची शेतकऱ्यांची थकबाकी माफ होणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शहरी भागातील कोरोना काळातील वीज बिले योग्य आहेत, सर्व स्लॅबनुसार आहेत. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ते ग्राहकांना व्यवस्थित समजून सांगितले गेले नाही. अधिकारी व ग्राहक यांच्यात कम्युनिकेशन गॅप आहे, त्यामुळे ही बिले योग्य कशी आहेत, हे ग्राहकांना समजून सांगण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिली आहे, असेही तनपुरेंनी स्पष्ट केले.

नव्या धोरणाबाबत ते म्हणाले...
नव्या कृषी वीज कनेक्शन्सची मागणी असतानाही २०१८पासून ते दिले गेलेले नाहीत, दरवर्षी सुमारे १ लाख वीज कनेक्शन्स मागणी अर्ज येतात. त्यामुळे आता कृषी वीज कनेक्शन देण्याचा धड़क कार्यक्रम नव्या धोरणात घेतला आहे.

राज्याची वीज बिल थकबाकी सुमारे ६० हजार कोटींची आहे व त्यात ४० हजार कोटी कृषी वीज पुरवठ्याची आहे. यातील मागील १० वर्षाच्या थकबाकीवर व्याजमाफी व शास्ती माफी तसेच व्याज आकारणी महावितरण ज्या व्याजाने कर्ज घेते, त्याच व्याजाने होणार आहे. यातून सुमारे १५ हजार कोटींची माफी-सवलत शेतकऱ्यांना मिळणार आहे. या वसुलीतील ६६ टक्के रक्कम ज्या गावातून वसुली झाली, त्याच गावातील वीज रोहित्र सक्षमीकरण व वीजपुरवठा अन्य पायाभूत सुविधा उभारणीवर खर्च होणार आहे. वीज बिल वसुलीचे काम ग्रामपंचायतींना प्रायोगिक तत्वावर दिले जाणार असून, प्रत्येक महसूल विभागात अशा ३-४ ग्रामपंचायतींना हे काम दिले जाणार आहे. यातून होणाऱ्या मागील थकबाकी वसुलीबद्दल ३० टक्के तर चालू बिल वसुलीबद्दल २० टक्के कमिशन त्या ग्रामपंचायतीला दिले जाणार आहे. साखर कारखान्यांनी अशी वसुली केली तर त्यांना १० टक्के असे कमिशन दिले जाणार आहे व ग्राहकांनी स्वतः थकबाकी भरली तर आणखी १० टक्के सवलत त्यांना दिली जाणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होण्यासाठी सीएम सौर कृषी वाहिनी योजना राबवली जाणार आहे. राज्यात ६८ हजार फीडरद्वारे सुमारे २५ ते ३० हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे, येत्या ३ वर्षात राज्यात सगळीकडे अशी वीज देण्याचा प्रयत्न आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत येथे असा दिवसा वीज देणारा सौर प्रकल्प होत आहे तसेच कर्जत, जामखेड, राहुरी, श्रीगोंदे व कोपरगावच्या अशा प्रस्तावांवर विचार सुरू आहे. या प्रकल्पांसाठी खासगी पडिक जमीनही भाडेतत्वावर घेण्याचा विचार आहे.

तो निर्णय पालकांनी घ्यावा
शाळा जरी सोमवारपासून सुरू होत असल्या तरी मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याचा निर्णय पालकांनी घ्यावा, असे स्पष्टीकरण मंत्री तनपुरेंनी दिले. ज्यांना मुलांचे शिक्षण ऑनलाईन योग्य वाटते, ते तसेच पुढे सुरू ठेवू शकतात, असे सांगून ते म्हणाले, जेथे कोरोनाचा उद्रेक जास्त आहे, त्या भागातील स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू न करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. नगर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर येणाऱ्या अडचणींबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिझेल प्रकरणाशी संबंध नाही
बनावट डिझेल प्रकरणाशी आपला दुरान्वयेही संबंध नाही, असे स्पष्ट करून तनपुरे म्हणाले, संबंधित आरोपी राहुरीचा असला तसेच राष्ट्रवादीचा पदाधिकारी असला व त्याचा पेट्रोल पंप असल्याचे माहीत असले तरी कोण काय करतो, हे मी पाहात नाही. पण कोणी कितीही जवळचा असला तरी तो चुकीचा वागत असेल तर राष्ट्रवादी अशांना पाठीशी घालणार नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

त्यांच्याकडे मुद्देच राहिले नाहीत
बनावट डिझेल प्रकरणाबाबत राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी मंत्री तनपुरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर राजकीय दबावाबाबत टीका केली होती. त्यावर बोलताना तनपुरे म्हणाले, त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, त्यांच्याकडे आरोपासाठी मुद्देच राहिलेले नाहीत. ते काय बोलले हे मी पाहिलेही नाही, भरीव व विधायक विकास कामे करण्यात मी व्यस्त आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post