मनपाच्या 'या' कारभारावर आमदार संग्राम जगताप नाराज

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर महापालिकेच्या माजी सैनिकांसाठीच्या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करण्याच्या कारभारावर राष्ट्रवादीचे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात ही नाराजी मनपा प्रशासनाबद्दल व्यक्त केली असली तरी लेकी बोले सुना लागे...प्रमाणे मनपातील सत्ताधारी भाजपचेही प्रश्नांकडे दुर्लक्ष होते, हेही या नाराजीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने मनपाच्या सत्तेत बसलेल्या भाजपला आ. जगतापांनी उपस्थित केलेल्या ज्वलंत प्रश्नाकडे आता गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.

माजी सैनिकांना मालमत्ताकरात सूट देण्याचे निर्णय ग्रामविकास मंत्रालयाने व नगर विकास मंत्रालयानेही दिले असतानाही नगर महापालिकेकडून या शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांवर महापालिकेकडून एकप्रकारे अन्यायच होत असल्याची भावना आ. जगताप यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. मालमत्ता करात सूट देण्याचा विषय मनपा प्रशासनाचा असला तरी सत्ताधारी भाजपने त्यासाठी आग्रह धरणेही गरजेचे आहे. शास्ती माफीत सूट देण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केल्यावर सत्ताधारी भाजपनेही ती उचलून धरली होती व प्रशासनाला शास्ती माफी देण्यास भाग पाडले होते. अशा स्थितीत माजी सैनिकांच्या मालमत्ता कर सूट देण्याबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांनी मागणी केल्याने तिची पूर्तता करण्याची जबाबदारीही सत्ताधारी भाजपवर आली आहे.

महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट देण्याच्या योजनेच्या एकत्रीकरणाबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती व त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास विभागाने १८ ऑगस्ट २० रोजी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना मालमत्ता करात सूट देण्याबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार अंमलबजावणीच्या सूचना नगर विकास विभागानेही ९ सप्टेंबरला दिले आहेत. पण यानुसार नगर महापालिकेत अजूनही अंमलबजावणी झाली नसल्याची खंत आ. जगताप यांनी मनपा आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. त्यामुळे तातडीने महापालिका हद्दीत राहणाऱ्या माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना मा. बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक योजनेचा लाभ दिला जावा, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावण्याचे केलेले कार्य विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने त्यांच्यासाठी ही योजना जाहीर केली आहे, असेही या पत्रात आवर्जून नमूद केले गेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post