रस्ता दुरुस्ती व वाढीव वीज बिलाविरोधात मनसे, आपचे आंदोलन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर-दौंड रस्ता सिमेंटचा झाला असला तरी नगरपासून व्हीआरडीईपर्यंतचा रस्ता खराब असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर दुसरीकडे कोरोना काळातील वाढीव आलेली वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीने आंदोलनअस्त्र उगारले आहे. नगरमध्ये शुक्रवारी ही आंदोलने झाली.

नगर-दौंड रस्त्यावरील विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता खराब झाला असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने अरणगाव ग्रामस्थ व या परिसरातील नागरिकांसह एमएससीआरडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, दीपक दांगट, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, आकाश पवार, अनिकेत जाधव, शुभम साबळे, आकाश कोराळ, मोहन जाधव, राहुल कांबळे, भरत माळवदे, प्रकाश जाधव, आकाश कोलघळ आदी यात सहभागी झाले होते.

यावेळी बोलतांना भुतारे म्हणाले, नगर-दौंड रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे, तरीही गेल्या अनेक दिवसांपासून व्हीआरडीई ते विद्यानगर भागातील रस्ता पूर्ण केलेला नाही, हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, तो दुरुस्त करावा, यासाठी निवेदने दिली. खड्ड्यात वृक्षारोपण केले परंतु आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, असा दावा त्यांनी केला. खराब रस्त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी प्रशासनास अजून जाग आलेली नाही. आतातरी तातडीने हा रस्ता दुरुस्त करुन चारपदरी रेल्वे लाईनवरील उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी एमएससीआरडीसीच्या अधिकार्‍यांनी आंदोलनानंतर रस्ता दुरुस्तीबाबत सकारात्मकता दाखवत येत्या आठ दिवसात या रस्त्याच्या कामास सुरुवात केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

वीज बिल माफीसाठी घंटानाद
टाळेबंदी काळातील सर्वसामान्यांची वीज बिले माफ झाली नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्यावतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुचिता शेळके, आश्‍विन शेळके, प्रज्वल डोंगरे आदी सहभागी झाले होते. सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव न ठेवणार्‍या राज्य सरकारचा निषेध नोंदवून घोषणा देण्यात आल्या. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर बहुतांश नागरिकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. सर्वांची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्याने रोजच्या उदरनिर्वाहाचा, मुलांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अनेक नागरिकांनी परिस्थिती गंभीर असल्याने वीज बील भरलेली नाही. तर काहींनी उसने व व्याजाने पैसे घेऊन वीज बिलाचा भरणा केला आहे. या परिस्थितीमध्ये आम आदमी पार्टीने सातत्याने टाळेबंदी काळातील वीज बील माफ करण्याची मागणी केली होती. मात्र राज्य सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असून, टाळेबंदी काळातील वीज बील माफ करण्याचा निर्णय न घेतल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post