मशरूम खाण्याचे फायदे वाचाल तर आवडत नसेल तरीही खाल..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कुत्र्याची छत्री म्हणून ओळखले जाणारे मशरूम म्हणजे वनस्पतीवर वाढणारी नैसर्गिक खाण्यायोग्य बुरशीच असते. वनस्पती आणि प्राणी या दोन्हींचे काही गुणधर्म मशरूम्समध्ये असतात. वनस्पतीत न आढळणारं ‘ड’ जीवनसत्त्व त्यात असतं. मशरूम्स लो कॅलरी, लो सोडियम आणि फॅट फ्री असल्यामुळे त्यांच्या सेवनामुळे वजन आटोक्यात राहू शकतं, फळांप्रमाणे मशरूम्स ग्लुटेन फ्री असतात. त्यात अ‍ॅन्टीऑक्सिडन्टस तर आहेतच याशिवाय सेलेनियम, कॉपर यासारखी खनिजं आणि पोटॅशियमही आहे. मशरूम्स हा ‘बी’ जीवनसत्त्वाचा एक चांगला स्रोत आहे. मशरूम पटकन शिजतात, सूप, पुलाव, भाज्या यात त्यांचा उपयोग केला जातो. फक्त मशरूम खाण्यायोग्य आहेत की नाही हे बघून घ्यावं लागतं. कारण काही मशरूम्स विषारी असतात.

पूर्व आशियाई देशात मशरूमचा वापर सर्वाधिक आहे. मुख्य म्हणजे ही फळभाजी पूर्णपणे सेंद्रीय आहे. रासायनिक पदार्थाचा वापरच होत नाही, त्यामुळे ती भेसळ करून बनवता येत नाही. यात असणारे प्रोटीन हे प्राथमिक दर्जाचे आहे, म्हणजे शरीरास जसे हवे तसे ते आहे. डाळ, बदाम यातही प्रोटीनचे प्रमाण अधिक असले तरी ते दुय्यम दर्जाचे आहे. मशरूमचा वापर ज्या देशात मोठय़ा प्रमाणावर होतो तेथे दरडोई वर्षांला ७० किलोपर्यंत त्याचा वापर होतो. भारतात हे प्रमाण केवळ अर्धा किलो इतके आहे. उच्चभ्रू लोकच याचा वापर करतात. उत्तरेप्रमाणेच तामिळनाडू, कर्नाटक या परिसरातही मशरूमचे उत्पादन घेतले जाते. लग्नसमारंभात या भाजीला मानाचे स्थान आहे. प्रोटीन शरीरात घेण्यासाठी मटन, मासे, दूध, सोयाबीन याचा वापर होतो मात्र शून्य कोलेस्टेरॉल असणारा एकमेव पदार्थ म्हणून मशरूमची ओळख आहे.

मशरूम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे शेतीत ज्याला टाकाऊ पदार्थ म्हणून ओळखले जाते अशी सोयाबीन व गव्हाची गुळी, शिवाय साखर कारखान्यात शिल्लक राहिलेला बगॅस (उसाचा रस काढून शिल्लक राहिलेला चोथा) याला सर्वाधिक महत्त्व आहे. २५ दिवसात या कच्च्या मालाचे खत तयार केले जाते. त्यात कोंबडीची विष्ठा, जिप्सम, डिओसी मिसळून त्यानंतर मशरूमचे उत्पादन मिळण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी लागतो. पुढील १५ ते २० दिवस हे उत्पादन विक्रीस उपलब्ध होते. आपल्या देशात १९६८ साली आयसीएआर दिल्ली येथे हिमाचल प्रांतातील सोलन येथे मशरूमचे संशोधन करणारे केंद्र सुरू झाले. मशरूम म्हणजे बुरशीवर्गीय भाजी आहे. जगभरात सुमारे १७ ते १८ हजार याचे प्रकार आहेत. मात्र खाण्यासाठी बटन मशरूम, ऑइस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. उर्वरित प्रकाराचे औषधी व विविध लाभ आहेत.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post