एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आली आहे. बँक कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर 2017 पासून पूर्वलक्षी प्रभावाने नवीन वेतन वाढ मिळणार आहे. दरम्यान, बँक कर्मचारी संघटनेने येत्या २६ रोजी आयोजित देशव्यापी संपाचा निर्धार कायम ठेवला आहे. बँकांतील विविध सेवांचे सुरू असलेल्या खासगीकरणासह अन्य प्रश्नांसाठी हा संप करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
अहमदनगर जिल्हा बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या सभासदांची सभा तेलीखुंट येथे बँक ऑफ इंडिया कार्यालयात नुकतीच झाली. यावेळी बँकांपुढील विविध आव्हानांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बँक कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रलंबित वेतन करारावर स्वाक्षरी होऊन शिक्कामोर्तब करण्यात आल्याबद्दल य़ावेळी समाधान व्यक्त केले गेले. बँक कर्मचारी व अधिकारी यांचा वेतन करार १ नोव्हेंबर २०१७ मध्ये संपुष्टात आला आहे. तब्बल तीन वर्षानंतर हा करार अस्तित्वात आला. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी धीर धरून व संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत संयमाने तोंड दिल्याबद्दल संघटनेने सर्व सभासदांचे अभिनंदन केले.
यावेळी बँकांचे विलिनीकरण खासगीकरणाचे धोके तसेच बुडीत व डुबीत कर्ज वसुलीसारख्या समस्यांबाबत माहिती देण्यात आली. जनतेच्या पैशाची सुरक्षितता ही बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. सरकार कामगार कायद्यात बदल करून कामगारविरोधी धोरणांची आखणी करीत आहे. यामुळे कारखानदार व उद्योगपतींचे फावणार असून कामगारांचे शोषण होणार आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी सर्व कामगार संघटनांनी देशभर संप पुकारला आहे. सभासदांनी हा संप सक्रिय सहभाग नोंदवून यशस्वी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना मिळालेली वेतनवाढ ही संघर्षातून मिळालेली असल्याने यामुळे हुरळून ना जाता संघटित राहून संघर्षाची तयारी ठेवावी व संघटनेच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. सध्याच्या काळात डिजिटलचा वापर जास्त प्रमाणात झाला असून अफवा पसरविण्याचे प्रमाण पाहायला मिळते. त्यामुळे फक्त संघटनेच्या अधिकृत परिपत्रकावरच विश्वास ठेवावा, असेही आवर्जून सांगण्यात आले. सभेला कांतीलाल वर्मा, माणिक दादाने, उल्हास देसाई, सुजय नाले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment