फटाके वाजवू नका व प्रदूषणमुक्त दिवाळी करा; महापौर वाकळेंचे नगरकरांना आवाहन

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करून प्रदूषणमुक्त दिवाळीचा आनंद नगरकरांनी घेण्याचे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे. दरम्यान, महापौरांच्या या आवाहनावर फटाके असोसिएशन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. महापालिकेचे कर्मचारी कचरा जाळतात तेव्हा त्यातून ऑक्सिजन निर्माण होतो का, असा सवाल फटाके असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले आहे. तर फटाके वाजवू नका म्हणत असाल तर मग महापालिकेने फटाके स्टॉलला परवानगी का दिली, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परेश पुरोहित यांनी केला आहे.

यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले आहे. या पार्श्वभूमीवर नगरला भाजपचे असलेले महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही नगरकरांनी यंदा फटाके उडवू नये, असे आवाहन केले आहे. तर मनपातील भाजप सत्तेला पाठिंबा देणारे शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सावेडी फटाका असोसिएशनच्या स्टॉल्सचे उदघाटन केले आहे. त्यामुळे यासंदर्भातील राजकीय चर्चा सुरू असताना स्थानिक नगरच्या स्तरावर फटाके असोसिएशन व मनसेनेही फटाके उडवण्यास विरोध केल्याने आता नगरमध्ये दिवाळीआधीच राजकीय फटाक्यांचे आवाज दणदणाट करण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे काळजी घेण्याची गरज-वाकळे
नगरकरांनी यंदाच्या दिवाळीत फटाके न उडवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करताना महापौर वाकळे यांनी कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली. या आवाहनात ते म्हणतात, सात ते आठ महिन्‍यापासून संपूर्ण जगामध्‍ये कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. यामध्‍ये अनेक निष्‍पाप नागरिकांचा जीव गेला आहे. अनेक ना‍गरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्‍यातून ते बरे झाले. पण कोरोनाचे सावट अजूनही संपलेले नाही. नगर शहरामध्‍ये कोराना रुग्‍णांमध्‍ये बऱ्याच प्रमाणात घट झाली असून कोरोनावर मात करण्‍यासाठी नागरिकांनी मास्‍क, सोशल डिस्‍टसिंग, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्‍यक आहे. सध्‍या दिवाळी उत्‍सवामुळे बाजारपेठेत मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्‍कचा वापर करणे आवश्‍यक आहे. तसेच दुकानदारांनी देखील खरेदी करण्‍यासाठी येणाऱ्या नागरिकांना मास्‍क लावल्‍याशिवाय दुकानात प्रवेश देवू नये. आपल्‍या दुकानातील कामगारांना देखील मास्‍क वापरण्याबाबत सक्‍ती करण्‍यात यावी. नागरिकांनी मास्‍कचा वापर केला नाही तर मनपास दंडात्‍मक कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्‍याची शक्‍यता वर्तविण्‍यात येत आहे. नागरिकांनी स्‍वत:ची काळजी घेवून कोरोनावर मात करण्‍याच्‍यादृष्टीने शासनाने दिलेल्‍या निर्देशाचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग पाहता दिवाळी सणामध्‍ये फटाके वाजवू नये, फटाके वाजविल्‍यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्‍या फुफ्फुसावर विपरित परिणाम होवू शकतो. त्‍यामुळे कोरोना रुग्‍ण व सर्वसामान्‍य नागरिक यांच्‍या आरोग्‍याला धोका निर्माण होतो. तसेट फटाके वाजवल्‍यामुळे शहरामध्‍ये मोठया प्रमाणात प्रदूषण होईल. त्य़ामुळे फटाके न वाजवता प्रदूषण मुक्‍त दिवाळी साजरी करावी. यामुळे नागरिकांचे आरोग्‍य चांगले राहील. मनपाच्‍या कोरोनासाठी आवश्‍यक असणाऱ्या उपाय योजना करीत आहे. परंतु नागरिकांनी देखील दिलेल्‍या निर्देशाचे पालन केल्‍यास कोरोनामुक्‍त शहर होण्‍यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी बाजार पेठेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व गर्दी असलेल्‍या ठिकाणी मास्‍कचा वापर करावा व नागरिकांनी आपल्‍या आरोग्‍याची काळजी घ्‍यावी, असे आवाहन महापौर वाकळे यांनी केले आहे.

आवाहनाला विरोध
फटाके असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी महापौरांच्या फटाके वाजवू नका, या आवाहनाला विरोध केला आहे. महापालिकेचे कर्मचारी भल्या सकाळी कचरा रस्त्याच्या कडेला जाळतात तेव्हा त्यातून प्रदूषण होत नाही का, की त्यातून ऑक्सिजनची निर्मिती होते, असा सवाल त्यांनी केला आहे. याशिवाय, मध्यंतरी, फटाकेमुक्त दिवाळीच्या चर्चेच्यावेळीही त्यांनी भूमिका मांडताना, राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फटाके उडवणे चालते, मग दिवाळीच्या काळातच का नको, असा सवालही केला होता. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परेश पुरोहित यांनीही महापौरांच्या आवाहनाला विरोध केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महापौरांच्या आवाहनाचा जाहीर निषेध असल्याचे सांगून ते म्हणाले, फटाके वाजवू नये असे आवाहन करता, मग फटाके स्टॉलसाठी मनपाने परवानगी का दिली ? त्या व्यावसायिकाकडून भाडे तुम्हाला चालते का, असा सवालही त्यांनी करताना महापौरांनी यावर उत्तर देण्याचे आवाहनही केले आहे.

स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पुरोहितांचा स्टंट : कवडे
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नागरिकांना फटाके न वाजवता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. दिवाळीत वाजनाऱ्या फटाक्यांच्या धुरामुळे वातावरणात प्रदूषण वाढते. अशा परिस्थितीत आजारी व वृद्ध नागरिकांना याचा त्रास तर होतोच, शिवाय धुराच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुप्फुसावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे कोरोना रुग्ण व सर्वसामान्य नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते. परंतु मनसेचे परेश पुरोहित यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर केलेली टीका ही हास्यास्पद आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारचा फतवा काढलेला नसून आवाहन केलेले आहे, बहुतेक वाचण्यामध्ये पुरोहितांकडून चूक झालेली असावी. आपल्या भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचा फतवा काढला जात नाही. आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही मध्ये फक्त आवाहनच करता येते, याची बहुधा पुरोहितांना माहिती नसावी.
 
महापौर वाकळे यांच्याबरोबरच नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील साहेब यांनी सुद्धा कोरोना पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी फटाके फोडू नये, असे आवाहन केले आहे. परंतु पुरोहितांनी टीका मात्र फक्त महापौरांवरच केलेली आहे यातूनच प्रसिद्धीसाठी असलेली आपली केविलवाणी धडपड दिसून येत आहे. फटाका स्टॉल धारकांकडून मनपा गाळे भाडे वसूल करणार हा प्रशासकीय विषय आहे. त्यांचे गाळे भाडे माफ करणे याचा अधिकार कोणालाही नाही, असे भारतीय जनता पार्टीचे मध्य नगरचे मंडल उपाध्यक्ष राहुल कवडे म्हणाले.

 

Post a Comment

Previous Post Next Post