'एएमसी मिरर' वृत्ताची दखल.. अखेर ती टोळी जेरबंद; अॅपद्वारे होत होती फसवणूक

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दुकानात जाऊन वस्तू खरेदी करणे व त्याचे पेमेंट ऑनलाईन करण्याचे सांगताना व दुकानाच्या दर्शनी भागात असलेला 'क्यूआर' कोड स्कॅन करण्याचा बहाणा करून पेमेंट झाल्याचा स्वतःच्याच मोबाईलवर आलेला बनावट मेसेज दुकानाच्या मालकाला दाखवून त्याची फसवणूक करण्याच्या प्रकाराला 'एमएमसी मिरर न्यूजपोर्टल'ने वाचा फोडली होती. पोलिसांनी नुकतीच अशा पद्धतीने फसवणूक करणारी टोळी पकडून या चोरांचा पर्दाफाश केला आहे.

'एमएमसी मिरर न्यूजपोर्टल'ने ''कोरोना काळात फसवणुकीचे वाढते प्रकार-पोलिसांपेक्षा सोशल मिडियावर तक्रारी व्हायरल'' अशा आशयाचे वृत्त दिले होते. बनावट अॅपद्वारे व्यापाऱ्यांची कशी फसवणूक होते, ते स्पष्ट यातून केले गेले होते. मार्केटमध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम,ॲमेझॉन पे सारख्या ॲपच्या माध्यमातून व्यावसायिकाला गंडा घालण्याचे प्रकार घडत असल्याने या वृत्ताची व्यापारी व व्यावसायिक वर्तुळात दखल घेतली गेली. यामुळे आलेल्या जागरूकतेमुळे पोलिसांसमोर अशा पद्धतीने फसवणूक करणारी टोळी पकडण्याचे आव्हान होते. पोलिसांनी मग विशेष पथकांद्वारे माग काढून अशी फसवणूक करणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे.

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील संजय सोनार, शुभम सोनवणे, रवी पटेल व राजू गुप्ता या चौघांनी त्यांच्या चारचाकी गाडीत (क्रमांक- एमएट ४४-डी-०००३) सोलापूर रस्त्यावरील सिद्धी पेट्रोल पंपावर ३ हजाराचे पेट्रोल भरल्यावर ऑनलाईन पेमेंट करणार असल्याचे सांगून पंपावरील क्यूआर कोड आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करीत असल्याचा बहाणा केला व पेमेंट झाल्याबद्दलचा स्वतःच्या मोबाईलवर आलेला सिस्टीम जनरेटेड मेसेज पंपाचे मॅनेजर प्रमोद खरे यांना दाखवला व भरधाव वेगात ते निघून गेले. इकडे खरे यांनी पंपाच्या बँक खात्यात तपासणी केल्यावर असे कोणतेही पैसे जमा झाले नाहीत, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी लगेच शोध मोहीम हाती घेतली. सोलापूर रस्त्यावरीलच दरेवाडी परिसरात ही गाडी असल्याचे समजल्यावर तेथे सापळा लावून या चौघांनाही पकडले गेले. तेव्हा ऑनलाईन व्यवहाराचा धक्कादायक फसवणूक प्रकार स्पष्ट झाला.

फसवणुकीसाठी अॅपचा वापर
बल्क एसएमएस पाठवण्याच्या अॅड्रॉईड अॅपचा वापर करून त्याद्वारे समोरच्या व्यक्तीला (व्यापारी-व्यावसायिक) आपल्याच मोबाईलवर असलेला पैसे मिळाल्याचा सिस्टीम जनरेटेड मेसेज फक्त दाखवून दाखवून (त्याच्या मोबाईलला पाठवून नव्हे) फसवणूक केली जात असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिशीरकुमार देशमुख यांच्यासह त्यांच्या सहकारी पोलिसांनी पकडलेल्या या भोसरी येथील टोळीने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथील रॉयल फूट वेअर व कारेगाव येथील अर्णव मोबाईल या दुकानांसह नगरमधील प्रसिद्ध आयरिश हॉटेल व माळीवाड्यातील साईकृपा कम्युनिकेशन या दुकानांतूनही अशी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या टोळीविरुद्ध रांजणगाव गणपती व नगरला कोतवाली पोलिसातही गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून २ मोबाईल, विविध प्रकारचे बुट व सँडल्स व चारचाकी गाडी असा २ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने नगरमध्ये अशा पद्धतीने आणखी कोणाची फसवणूक केली काय याचा शोध पोलिस घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post