पीएम किसान योजनेत १९ हजारावर अपात्र; ८ कोटींच्या वसुलीची प्रक्रिया सुरू


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

केंद्र सरकारने दीड वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान निधी (पीएम किसान) योजनेत अनेक अपात्र शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. 

राज्यातील ३ लाख ३७ हजार २८८ अपात्र शेतकऱ्यांकडून २५१ कोटी २१ लाख रुपये वसुली महसूल विभागाने सुरू केली आहे. या अपात्र शेतकऱ्यांमध्ये नगरचे सर्वाधिक शेतकरी आहेत. एका कुटुंबांतील अनेकांकडून लाभ, नावावर शेती नसणे व अन्य कारणांमुळे राज्यातील १ लाख ७ हजार ६ शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यांनी उचललेल्या २ लाख १३ हजार ५०५ हप्त्यांची ४२ कोटी ७० लाख १० हजार रुपये निधीची वसुली होणार आहे. यात सर्वाधिक १९ हजार ४०१ शेतकरी नगर जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून ८ कोटी ९ लाखांची वसुली होईल. त्यानंतर यवतमाळचा क्रमांक लागत असून ८ हजार ६०५ शेतकऱ्यांकडून ४ कोटी ९५ लाखांची वसुली होईल. अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या सातशे ते चार हजारांच्या दरम्यान आहे. राज्यात २ लाख ३० हजार २८२ शेतकरी प्राप्तिकर भरणारे तर १ लाख ७ हजार ६ शेतकरी अन्य कारणांमुळे या योजनेसाठी अपात्र ठरले होते. या योजनेतून शेतकऱ्याच्या बँक खात्यावर वर्षांतून तीन वेळा दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. प्राप्तिकर भरणाऱ्यांसह काही घटकांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. कुटुंबांतील पती, पत्नी व १८ वर्षांखालील अपत्यांपैकी एकालाच योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, अपात्र ठरवलेले अनेक शेतकरी योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. प्राप्तिकर विभागाकडून यादी पडताळून घेतल्यानंतर प्राप्तिकर भरणारे शेतकरीही योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले. त्याशिवाय एका कुटुंबांतील अनेकांच्या व मृतांच्या नावावरही लाभाची रक्कम जमा होत असल्याचे उघड झाले. अशा सर्वांना पीएम किसानची रक्कम रोख अथवा ऑनलाइन भरण्यासाठी नोटिसा बजावण्यास सुरवात प्रशासनाद्वारे सुरू झाली आहे. ३४ लाखांची वसुलीही राज्यात झाली आहे. २३ ऑक्टोबरपर्यंत ३७२ अपात्र शेतकऱ्यांकडून १ हजार ६१८ हप्त्यांची ३३ लाख ८० हजार रुपयांची वसुली केली आहे. यात प्राप्तिकर भरणाऱ्या २६४ शेतकऱ्यांकडून २४ लाख ८४ हजारांची वसुली झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post