'दुसऱ्यांसाठी खड्डा खोदल्यास स्वतःचाच पाय अडकतो हा अनुभव भाजपा घेत आहे'

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान शनिवार पार पडलं. त्यानंतर आता १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, विविध वृत्तवाहिन्यासह संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत. यानुसार बिहारच्या जनतेने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ”सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजपा घेतोय.” असं त्यांनी म्हटलं आहे.


“बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्झिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजपा घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपाने काहीतरी बोध घ्यावा.” असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अमेरिकेतील निवडणूक निकालावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. “अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून, अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे. ” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

तसेच “जेंव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही. तेंव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे!” असं या अगोदर रोहित पवार यांनी ट्वटि केलं होतं. यासोबत त्यांनी जो बायडन यांचा पावसात भाषण करतानाचा फोटोही शेअर केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे भर पावसात केलेल्या भाषणाशी याचा संदर्भ असल्याचे दिसून येते.

दरम्यान, एक्झिट पोलच्या कलानुसार बिहारमध्ये ‘राजद’ हा सर्वात मोठा पक्ष, तर भाजपा दुसरा सर्वाधिक मतं मिळवणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये २४३ जागांसाठी शनिवारी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडलं. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १२२ ही मॅजिक फिगर आहे. दरम्यान, एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता काबीज करता येणार नाही. मात्र, भाजपा-जदयूच्या एनडीए आणि राजद-काँग्रेसच्या महागठबंधनमध्ये चुरशीची लढत होईल. तरी यामध्ये महागठबंधनचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post