ही तर विधान परिषदेची तयारी.. कदम यांच्या निवडीनंतर चर्चेला उधाण


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यस्तरीय नगरसेवक परिषदच्या नगर जिल्हाध्यक्षपदी नगर मनपाचे माजी नगरसेवक व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र संस्थापक-अध्यक्ष राम जगदाळे व प्रदेश सरचिटणीस कैलास गोरे यांनी नुकतेच त्यांना दिले आहे. दरम्यान, नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीमुळे कदम यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली काय? अशी चर्चा नगरच्या राजकीय वर्तुळातून सुरू झाली आहे.

महाराष्ट्रातील नगरपालिका, महानगरपालिकेतील नगरसेवकांना त्यांचे हक्क आणि मान-सन्मान, मानधन मिळवून देणे, नगरसेवकांच्या अधिकारात भरीव वाढ करणे अशा विविध विचाराने नगरसेवक परिषद संघटना काम करणार आहे. लवकरच मुंबई येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक होणार असल्याचे अध्यक्ष राम जगदाळे यांनी सांगितले. नूतन जिल्हाध्यक्ष संभाजी कदम यांनीही नगरसेवकांना त्यांचे हक्क मिळावे, नगरपालिका व महानगरपालिकेला हक्काचा निधी मिळवावा यासाठी वेळावेळी जिल्ह्यातील नगरपालिकेच्या नगरसेवकांसह संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी नगरसेवक म्हणून विविध पातळ्यांवर केलेल्या चांगल्या कामांची दखल घेऊन जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. आता संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील नगरसेवकांचे संघटन करून त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे कदम यांनी सांगितले. या निवडीबद्दल जिल्हाभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

आमदारकीची तयारी?
नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती म्हणजे विधान परिषदेच्या आमदारकीची तयारी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. नगर जिल्ह्यात एक महापालिका तसेच प्रत्येक तालुक्यात नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत आहे. सर्व मिळून सुमारे ३०० नगरसेवक असतील. त्यांचे संघटन करणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधान परिषद निवडणुकीत चांगली राजकीय ताकद निर्माण करण्यासारखे आहे. संभाजी कदम यांनी महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केले आहे व ते नगर शहराचे माजी शिवसेना शहर प्रमुख आहेत. तसेच त्यांच्या पत्नी सुरेखा कदम यांनी नगरचे महापौरपदही भूषवले आहे. नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थास्तरावर त्यांचे नाव व कार्यही परिचित आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून आगामी दोन वर्षांनी (2022) होणाऱ्या नगर स्थानिक स्वराज्य मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील नगरसेवकांचे मजबुत संघटन निर्माण करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. अर्थात विधान परिषदेपेक्षा विधानसभा आमदारकीची त्यांची इच्छा आहे व मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारीही मागितली होती. त्यामुळे आता नगरसेवक परिषदेच्या माध्यमातून नगरसेवकांचे ते करणार असलेले संघटन नेमके कोणत्या राजकीय विषयासाठी वापरणार, याची उत्सुकता नगर शहराच्या व जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post