शहीद राजगुरूंच्या वंशजाचा झाला सन्मान; राजगुरूनगरमध्ये दीपोत्सव


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारल्यावर देशासाठी शहीद झालेले शिवराम हरी राजगुरू यांचे नगरमध्ये राहणारे वंशज (नातू) विलास राजगुरू यांचा नुकताच पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील राजगुरूवाड्यात सन्मान करण्यात आला. शहीद राजगुरू यांचे चुलतबंधु विश्वनाथ राजगुरू यांचे विलास राजगुरू हे नातू आहेत. त्यांच्या या सन्मानासह शहीद राजगुरू यांच्या जीवनावरील ''क्रांतिसूर्य राजगुरू'' या वेबसिरीजच्या कलावंतांच्या सन्मानानिमित्त राजगुरूवाड्यावर दीपावलीचा दीपोत्सव करण्यात आला.

जाणीव परिवार संस्थेच्यावतीने सलग सहाव्या वर्षी राजगुरूवाड्यावर एक हजार दीप लावून शहीद राजगुरु यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्या उजेडाने राजगुरूवाडा उजळून निघाला. यावेळी मयुर पाचारणे यांनी बासरीवर, तर संदीश शिंदेकर यांनी ढोलकीवर देशभक्तीपर गीते सादर केली. शशिकांत पावडे यांनी हुतात्मा राजगुरू यांची रांगोळी साकारली. अरुण गुरव यांच्या हस्ते राजगुरू यांच्या जीवनपटावरील फ्रेम देऊन वंशज विलास राजगुरू यांचा सत्कार केला गेला. अजिंक्य बकरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. अतिक सय्यद, अमोल वाळुंज, शैलेंद्र बकरे, ऋषिकेश सारडा, रोहित बेलसरे, श्रेयस अहिरे, ओंकार कहाणे, सौरभ लुणावत, प्रसाद निंबाळकर, हितेश शेटे, अभिजित घुमटकर, संदिश शिंदेकर, सुमित खन्ना, सुजित डावरे, श्रीराज चव्हाण, अमर टाटिया, मच्छिंद राक्षे, अभिजीत तापकीर, मयूर पाचारणे, रोहित बोरुडे,निखिल सातकर आदी जाणीव परिवारातील सदस्य उपस्थितीत होते.

या वेळी बोलताना शहीद राजगुरू यांचे वंशज विलास राजगुरू म्हणाले, "भारत देशासाठी राजगुरू परिवार ४०० वर्षांपासून कार्यरत आहे. सन १८५७ च्या राष्ट्रीय उठावात हुतात्मा राजगुरू यांचे सख्खे चुलत आजोबा देवराव राजगुरू यांनी तात्या टोपे यांना मदत केली होती. तसेच टोपे यांची मावस बहीण या हुतात्मा राजगुरू यांच्या चुलत आजी होत. भारतीय सैन्यातील लान्स नाईक शरद राजगुरू यांनी भारत-चीन युद्धात शौर्य गाजवले होते. पाकिस्तानशी झालेल्या युद्धात ते शहीद झाले. शहीद राजगुरू, सुखदेव व भगतसिंग यांचे बलिदान देशातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरावे म्हणून काव्या ड्रीम मुव्हीजच्या मदतीने 'क्रांतिसूर्य राजगुरू' या वेबसिरीसची निर्मिती होत असल्याची माहिती त्यांनी दिली. आशिष निनगुरकर या वेबसिरीजचे लेखन करीत असून सिद्धेश राजगुरू क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post