'योद्धा @ ८० - अजूनी चालतोची वाट' : शरद पवारांच्या जीवनावर शॉर्टफिल्म स्पर्धा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जीवनावर राष्ट्रवादीच्यावतीने राज्य व देशभरातील कलावंतांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन केले आहे.'योद्धा @ ८० - अजूनी चालतोची वाट' ही शॉर्टफिल्म स्पर्धा ही पवार यांच्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीची माहिती लघुपटाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित केली आहे. तसेच आताच्या काळातील फिल्म मेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक-युवतींकडून पवार साहेबांच्या कारकीर्दीवर चांगल्या कलाकृतींची निर्मिती व्हावी, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील कलावंत तरुण-तरुणींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांना आपले काम जगासमोर आणण्याची संधी या स्पर्धेच्यानिमित्ताने मिळणार आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या पुढाकाराने होत असलेली ही स्पर्धा ट्रस्टच्या विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून होत आहे.

देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषीमंत्री, पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने 'योद्धा@ ८० - शॉर्टफिल्म स्पर्धा २०२०' आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी नुकतीच फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने राज्यभरात अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात.

या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म ठरणाऱ्या कलाकृतीस करंडक, प्रमाणपत्र तसेच रोख १,००,०००/- रुपये मिळणार आहेत. द्वितीय पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये ७५,०००/- तर तिसरे पारितोषिक करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये ५०,००० असणार आहे. या पारितोषिकांव्यतिरिक्त आणखी काही पारितोषिके दिली जाणार आहेत. अ) विशेष पारितोषिक (एकूण १२ ) : विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई (एमएमआरडीए विभाग) विभागातील प्रत्येकी एका शॉर्टफिल्मला ज्युरी पसंतीचे विशेष पारितोषिक व याव्यतिरिक्त वरील ६ (सहा) विभागातील महिला दिग्दर्शकांच्या ६ निवडक शॉर्टफिल्मला विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व रु.१०,००० रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल. ब) विशेष पारितोषिक (एकूण २) : महाराष्ट्राबाहेरील प्रवेशिका असलेल्या एका शॉर्टफिल्मला ज्युरी पसंतीचे विशेष पारितोषिक तसेच एलजीबीटी घटकातील एका दिग्दर्शकास ज्युरी पसंतीने निवडलेले विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व रु.१०,०००/- रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल. क) प्रेक्षक पसंती पारितोषिक (एकूण ३ ) : सुप्रिया सुळे या यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक लाईक्स मिळविणाऱ्या पहिल्या तीन शॉर्टफिल्मला विशेष पारितोषिक, प्रमाणपत्र व रु.१०,०००/- रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेत जास्तीतजास्त ३ मिनिट कालावधीची शॉर्टफिल्म स्वीकारली जाईल.

प्रवेशिका अर्ज-
www.supriyassule.comwww.ncp.org.in या दोन्ही वेबसाईटवर डाऊनलोड करीता उपलब्ध आहेत.स्पर्धकांना १२ नोव्हेंबर २०२० पासून ५ डिसेंबर २०२० पर्यंत शॉर्टफिल्म स्पर्धेकरिता पाठविता येतील. शॉर्टफिल्म दिग्दर्शकास वयाची कोणतीही मर्यादा नाही.

Post a Comment

Previous Post Next Post