सोमवारपासून साई मंदिरात दररोज ६ हजार भाविकांना दर्शन; भाजप करणार दर्शन सोहळा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोनामुळे मागील ७-८ महिन्यांपासून बंद असलेले शिर्डीतील श्रीसाई समाधी मंदिर सोमवारी (१६ नोव्हेंबर) दिवाळी पाडव्याच्या दिवशी भाविकांसाठी खुले होणार आहे. साई संस्थानने रोज सहा हजार भाविकांना समाधी दर्शन घेता येईल असे नियोजन केले आहे. दरम्यान, भाजपने शिर्डीतील साई समाधी दर्शनाचा सामूदायिक सोहळा करण्याचे नियोजन केले आहे. मंदिरे खुली करण्यासाठी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने शिर्डीतच आंदोलन केले होते व त्यावेळी सहभागी साधु-महंत आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे आता मंदिरे खुली करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यावर संत-महंतांसह साई समाधी दर्शनाचा सोहळा १६ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता शिर्डीत भाजपद्वारे होणार आहे.

कोरोना काळाचा सर्वाधिक फटका राज्यभरातील बड्या देवस्थानांना बसला आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी व शनिशिंगणापूर देवस्थानेही त्याला अपवाद नव्हती. शिर्डीतील श्रीराम नवमी उत्सव व गुरुपौर्णिमा उत्सव यंदा भाविकांविना साजरा झाला, या उत्सव काळात देणगी रुपाने येणारे देवस्थानचे उत्पन्नही यंदा कमालीचे घटले. वारकरी संप्रदाय, भाजप आध्यात्मिक आघाडी, हिंदू जनजागृती समितीसह विविध धार्मिक संघटनांनी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलनेही केली होती. मदिरालये सुरू, पण मंदिरे बंद...अशा शब्दात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली होती. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून मंदिरे सुरू होत आहे. नगर शहरातील ग्रामदैवत माळीवाड्यातील विशाल गणेश मंदिर, केडगावचे रेणुका माता मंदिर, बुऱ्हाणनगरचे तुळजाभवानी मंदिर तसेच नवीपेठेतील श्रीराममंदिर, सर्जेपुरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, सबजेल चौकातील तुळजाभवानी मंदिर, दिल्लीगेचजवळील शनि-मारुती मंदिर व अन्य छोटी-मोठी मंदिरे सोमवारपासून खुली होणार आहे. जिल्ह्यातीलही मढीचे कानिफनाथ मंदिर, मोहटादेवी मंदिर, देवगड दत्त देवस्थान, श्रीरामपूरचे श्रीराम मंदिर अशा अनेक मंदिरातून रविवारी स्वच्छता केली गेली. तसेच सोमवारपासून मंदिरांतून भाविक येण्यास सुरुवात झाल्यावर त्यांचे आधी सॅनिटायझेशन, नंतर सोशल डिस्टन्सिंगने मंदिर प्रवेश व प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक या नियमांचे नियोजन सुरू होते. त्यासाठी विशेष पथके नेमण्याचे काम सुरू होते.

शिर्डीला रोज सहा हजार भाविक
सोमवारी पहाटे काकड़ आरतीपासून साई मंदिर खुले होणार असून, साईसमाधी दर्शन सुरू होणार आहे. रोज 6000 भक्तांना समाधीदर्शनाला लाभ दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाइन पास 3000 आणि टोकन बायोमेट्रिक पास (फ्लेक्सिबल) दिले जाणार आहे. भाविकांना मास्क कंपल्सरी आहे. भक्तांच्या सुरक्षेसाठी साई संस्थान सज्ज झाले असून, प्रसादालय व भक्तनिवासही सुरू होणार आहे. भाविकांना फुल-हार-प्रसाद साई समाधी मंदिरामध्ये नेण्यास बंदी असणार आहे. दर्शनासाठी मंदिर प्रवेश द्वारकामाई मंदिरापासून (गेट क्रमांक 2) आणि भाविकांना मंदिराबाहेर गेट क्रमांक ५ द्वारे सोडले जाणार आहे. दर्शन लाइन अशी राहणार- द्वारकामाई -समाधी मंदिर-गुरुस्थान आणि 5 क्रमांक गेटद्वारे साईभक्त बाहेर निघतील.

भाजप करणार सोहळा
मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलनाची राळ उठवणारे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले राज्यातील प्रमुख साधु-संतांसह सोमवारी (१६ नोव्हेंबर) साईबाबा समाधी दर्शनासाठी शिर्डी येथे येणार आहेत. याच ठिकाणी त्यांच्यासह साधु-संतांना तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यावर समाधी दर्शनासाठी सर्वजण पुन्हा शिर्डीत येत आहेत. त्यांच्यासह वारकरी संप्रदायाचे भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजयनाना महाराज धोंडगे, ग्लोबल महानुभाव संघाचे सुदर्शन महाराज महानुभाव, जैन धर्माचे आचार्य जिनेंद्र जैन यांच्यासह अनेक धर्माचार्य सहभागी होणार आहेत. यावेळी भाजप उत्तर नगर जिल्हा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे उपस्थित राहणार आहेत. सोमवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता हा दर्शन सोहळा होणार आहे. बबनराव मुठे यांनी या उपक्रमाचे संयोजन केले आहे.

तुळजापूरलाही नियोजन सुरू
महाराष्ट्राचे आराध्यदैवत तुळजापूरची आई तुळजाभवानी मंदिरही सोमवारपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात सोशल मिडियातून मेसेज व्हायरल होत आहेत. यात म्हटले आहे की, सर्व देवीभक्तांना कळवण्यात येते आहे की सोमवार 16/11/2020 पासून आई तुळजाभवानीचे मंदिर दर्शनासाठी खुले होत आहे. पण रोज दर्शनासाठी फक्त 4000 लोकांना पास घेऊन मंदिरामध्ये जाता येईल. मंदिरामधील अभिषेक, सिंहासन, गोंधळ, जावळ व इतर सर्व पूजा सुरू करण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार सुरू आहेत. मंदिर प्रशासनाने अधिकृतरित्या माहिती प्रकाशित केल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल. मंदिरात देवीभक्तांना साडीचोळी-ओटी भरून महाआरती करण्यात येईल. मंदिरात मास्क वापरणे बंधनकारक आणि वय वर्ष 10 च्या आतील लहान मुलांना व वय वर्ष 65 च्या पुढील वृद्ध भाविकांना दर्शन मिळणार नाही. सर्व दर्शन फक्त मुखदर्शन मिळणार आहे. मुख्य गाभाऱ्यात दर्शन मिळणार नाही. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही या मेसेजमध्ये करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post