घशाची खवखव, खोकला.. दुर्लक्ष करू नका.. 'अशी' घ्या काळजी..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

थंडीच्या काळात नाक, कान आणि घशाच्या समस्या वाढतात. चांगल्या आरोग्यासाठी या तीन अवयवांचे कार्य व्यवस्थित चालणे गरजेचे आहे. ऐकणे, गंधाची जाणीव आणि बोलणे यासाठी या अवयवांचे महत्त्व आहे. त्यामुळे थंडीत होणाऱ्या विविध आजारांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. घशाची खवखव, खोकला बरा होत नसेल तर ड़ॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कोरोना संकट आणि थंडीच्या काळात अशा आजारांपासून स्वतःचा बचाव करणे गरजेचे आहे. योग्य ती काळजी घेतल्यास आजारांपासून बचाव करणे शक्य होते.

व्हायरल इंफेक्शनमुळे घशाची खवखव, गिळण्यासाठी त्रास,सर्दी पडसे याचा त्रास होतो. जर हा त्रास 4-5 दिवसात कमी झाला नाही, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. प्रदूषणामुळे कान, नाक, घशाबाबतच्या समस्या वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. बदलत्या जीवनशैलीमुळेही समस्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. पान मसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने म्यूकस फाइब्रोसिस नावाचा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे रुग्णाला तोंड उघडता येत नाही. या आजारावर उपाय नाही. तसेच शस्त्रक्रियाही गुंतागुंतीची असते. त्यामुळे या पदार्थांचे सेवन टाळावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

अनेकदा पोटातील समस्यांमुळेही घशाचा त्रासही होऊ शकतो. अॅसिडिटीमुळेही घशाशी संबंधित त्रास होऊ शकतो. अनेकदा अॅसिडिटीमुळे तयार झालेले अॅसिड घशांपर्यत येते, त्यामुळे घशाची खवखव वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. घशात असलेले टॉन्सिल संक्रमणाला कारणीभूत ठरते. रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले अनेकजण अशा संक्रमणाला बळी पडतात.

घशाचा त्रास झाला तर प्रथमोचार म्हणून काही घरगुती उपचार करता येतात. महत्त्वाचे म्हणजे झोपण्यापूर्वी तीन तास आधी जेवण करणे गरजेचे आहे. जेवण झाल्यावर लगेच झोपायला जाऊ नये. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. दिवसातून तीनवेळा भरपेट आहार घेण्याऐवजी थोड्याथोड्या वेळाने खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तसेच दिवसातून कमीतकमी तीनवेळा गरम पाण्याने गुळण्या करणे गरजेचे आहे. तसेच मसालेदार आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खाण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

घशात खवखव किंवा जळजळ होऊ लागल्यास दहीभात, ताक ,दही, लस्सी असे थंड पदार्थ आहारात घेण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र, त्रासाचे नेमके कारण समजून आहारात बदल करणे गरजेचे आहे. घशाचा त्रास असल्यास कोणेतही पदार्थ टाळण्याची गरज नाही. मात्र, ज्या पदार्थांनी अॅलर्जी होते किंवा व्हायरल इन्फेक्शनची शक्यता असते, असे पदार्थ टाळावेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)


Post a Comment

Previous Post Next Post