जेईई परीक्षा प्रतीक्षेत; राज्यभरातील विद्यार्थी अस्वस्थ

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे (एनटीए) अजूनपर्यंत जेईई मुख्य परीक्षा २०२१ची कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे या परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम व अन्य माहिती नसल्याने राज्यातील विद्यार्थी अस्वस्थ आहेत. दरवर्षी एनटीएतर्फे ऑगस्ट महिन्यातच जानेवारीत होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाते. पण आता नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी एनटीएची अधिसूचना आलेली नाही. त्यामुळे सोशल मिडियातून विद्यार्थी एनटीएला यासंदर्भात घोषणा करण्यासाठी आग्रह करीत आहेत.

या वर्षी करोनामुळे १२वीच्या अभ्यासक्रमापासून शैक्षणिक धोरणापर्यंत सर्व बदलले आहे. अशा परिस्थितीत आगामी शिक्षण मंडळ आणि जेईई मुख्य परीक्षा कशी असेल, याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना आहे. जुलै महिन्यात सीबीएसईने ९वी ते १२वीपर्यंतचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी केला. परंतु एनटीएने अद्याप जेईई अभ्यासक्रम कमी करण्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यातही अडचणी येत आहेत. परीक्षेचा अभ्यासक्रमच निश्चित नसल्याने कुठल्या विषयाचा अभ्यास करावा, कोणत्या विषयाला अधिक महत्त्व द्यावे, या संभ्रमात विद्यार्थी आहेत.

जेईईची पहिली परीक्षा जानेवारीत व दुसरी एप्रिलमध्ये घेतली जाते. विद्यार्थी दोन्ही वेळा परीक्षा देऊ शकतात. दोघांपैकी ज्यामध्ये सर्वाधिक गुण आहेत, त्या आधारावर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. मात्र यावेळी करोनामुळे शिक्षण मंडळाच्या परीक्षांनंतर फक्त एकदाच जेईई मुख्य परीक्षा होणार असल्याची चर्चा विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आहे.

Post a Comment

Previous Post Next Post