यंदा होणार साखरच साखर.. देशात ३२० लाख टन निर्मितीचा अंदाज

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

या वर्षी देशात ३२० लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज असून यामुळे साखरच साखर होणार आहे. देशभरातील साखरेचा सर्व प्रकारचा वापर पाहिला तर यंदा ७० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत कच्ची वा पक्की अशा कोणत्याही प्रकारची साखर केंद्राने आयात केली तर त्यामुळे साखरेचे भाव पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील २०२ साखर कारखान्यांपैकी १४८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. उपलब्ध ऊस आणि गाळपाची क्षमता लक्षात घेता या वर्षी गाळप हंगाम १६० दिवसांहून अधिक चालेल अशी शक्यता आहे. दरवर्षी १२० दिवसांपर्यंत गाळप हंगाम चालतो. एप्रिलअखेपर्यंत साखर कारखाने सुरू राहतील, असे सध्या तरी दिसते. सध्या तोडणी यंत्रणा पुरेशी नसल्याने क्षमतेपेक्षा कमी गाळप सुरू आहे. करोनामुळे ऊसतोडणी मजुरांची संख्या तुलनेने कमी आहे. सहा लाख मजूर तोडणीसाठी बाहेर पडतील असा अंदाज होता. मात्र, तेवढय़ा मोठय़ा प्रमाणात मजूर उपलब्ध नसल्याने हार्वेस्टरच्या आधारे तोडणीवर भर दिला जात आहे. यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडल्यामुळे त्यांचे छोटे तुकडे होतात. साखर कारखान्यातील ऊस वाहून नेणारी गव्हाण मोळी वाहतुकीच्या दृष्टीने बनविलेल्या आहेत. त्यामुळे काही उसाची टिपरे आणि काही मोळया असा ऊस गाळपासाठी पाठवावा लागतो. परिणामी प्रतिदिन गाळप क्षमता आणि तोडणी याचे सूत्र जुळत नसल्याचे दिसून येत आहे.

राज्याचा विचार करता गेल्या वर्षीची ६२ लाख टन साखर शिल्लक असताना त्यामध्ये यंदा ९९ लाख टन साखरेची भर पडणार आहे. परिणामी हे उत्पादन अतिरिक्त होणार असल्याचा अंदाज आहे. राज्याला प्रतिवर्षी खाणे आणि वाणिज्यिक वापर अशा ३५ लाख टन साखरेची गरज असते. सध्या १४८ कारखाने सुरू झाले असून त्यातून १३० लाख टन गाळप झाले आहे, तर १०९ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर पडल्याने साखर निर्यात ठप्प आहे. दरावर सरकारचे बंधन असल्याने अतिरिक्त उत्पादन झाले तरीही साखरेचे भाव कमी होणार नाहीत, असेही सांगितले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post