मूत्रपिंड निकामी होण्याची आणि यूरिया क्रिएटिनिन पातळी वाढण्याची लक्षणे कोणती?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मूत्रपिंड निकामी झाल्यास यूरिया व क्रिएटिनिनची शरीरातील पातळी वाढत जाते. मूत्रपिंड निकामी झाल्यास क्रिएटिनिन हे एक दर्शक (indicator) म्हणून काम करते. वास्तविक लक्षणे ही इतर घटके शरीरातून विसर्जित न झाल्यामुळे दिसतात.


पाण्याचे उत्सर्जन कमी झाल्यास..
मूत्रपिंड निकामी झाल्यास मुखत्वे लघवीचे प्रमाण कमी होते. अशा वेळेस जर पाणी पिण्याचे प्रमाण नियंत्रणात आणले नाही, तर शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते. परिणामी आपल्याला शरीरात सूज आलेली दिसून येते. ही सूज सर्वप्रथम चेहऱ्यावर डोळ्यांभोवती व नंतर पायांवर दिसते.

जर हे अतिरिक्त पाणी खूपच जास्त झाले, तर ते फुफ्फुसामधे जाते व फुफ्फुसातील सूक्ष्म वायुकोष्ठकांमध्ये जमा होते. परिणामी शरीरात ऑक्सिजनचे शोषण शरीरात नीट होत नाही. ही गंभीर बाब असू शकते. रुग्णास कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागू शकतो. प्रसंगी जास्त प्रमाण असल्यास respiratory failure होऊन रुग्ण दगावू शकतो.

रक्तदाब
मूत्रपिंड शरीरातील रक्तदाब सामान्य राखण्यास देखील महत्वाचे कार्य करते. Renin-angiotensin- aldosteron नामक हार्मोन्सद्वारे हे काम होते. परंतु निकामी मूत्रपिंड रक्तदाब नियंत्रणात आणू शकत नाही. परिणामी रक्तदाब अतिशय जास्त प्रमाणात वाढतो.

हृदय
अति जास्त पाण्याचे प्रमाण व रक्तदाब हे हृदयावर ताण निर्माण करतात व हृदयाचा आकार वाढतो (hypertrophy) व विविध हृदयरोग जडतात.

कॅल्शिअम व फॉस्फोरस
शरीरात कॅल्शिअम कमी होते ज्याने हाड ठिसूळ होतात. फॉस्फोरसचे प्रमाण वाढते . त्याने शरीरात कॅलशियम व फॉस्फोरसचे संयुग वेगवेगळ्या ठिकाणी जमा होतात.

सोडियम व पोटॅशियम
यांचे देखील संतुलन बिघडते. परिणामी पोटॅशिअम वाढते व याचे पर्यावसान हृदयाच्या स्पंदनावर होते. यामुळे हृदयाघात होऊ शकतो.

त्वचा
विषारी तत्त्वांमुळे शरीरावर खाज निर्माण होते. नखें अति जास्त तकतकीत होतात. त्वचेचे नैसर्गिक तेज नष्ट होते व त्वचा रुक्ष होते.

रक्तक्षय
मूत्रपिंड शरीरात लाल रक्तपेशी बनवण्याची प्रक्रिया वाढवतात. यासाठी ते एरीथ्रोपोएटिन नावाचे घटक स्रवतात. मूत्रपिंड निकामी झाल्यास हे घटक मूत्रपिंड बनवू शकत नाही. परिणामी अति जास्त रक्तक्षय होतो.

पचनतंत्र
विषारी घटकांचे पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मळमळ, उलट्या इत्यादी त्रास होतात. यालाच युरेमिक गॅस्ट्रीटीस म्हणतात.

रोग प्रतिकारशक्ती
रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन रुग्ण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो. यात मुख्यत्वे फुफ्फुसांचे आजार जास्त दिसून येतात.

चेतासंस्था
हातापायांचे स्पर्श संवेदनशीलता कमी होते. हातापायास मुंग्या येणे व अंग दुखणे, हातपाय वळणे इत्यादी लक्षण दिसतात.

मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. विसरभोळेपणा, चिडचिड इत्यादी उद्भवतात. विषारी घटक फार जास्त प्रमाणात वाढल्यास विचित्र वागणूक, असम्बद्ध बडबड, अपस्मार इत्यादी लक्षणे दिसतात. केवळ मूत्रपिंड निकामी झाल्याने वरील विकार जडतात त्यामुळे शरीराची योग्य निगा व आहारावर लक्ष असणे आवश्यक आहे.

(कोरा या संकेतस्थळावर विक्रांत चिखले यांनी ही माहिती दिली आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post