उतारवयात तंदुरुस्त शरीरासाठी ‘हे’ पदार्थ गरजेचे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

निरोगी राहण्यासाठी आणि शरीराची तंदुरुस्ती जपण्यासाठी विविध प्रकारच्या विटामिन्स, जीवनसत्त्वे आणि प्रथिनांची गरज असते. यातील काही घटकांचे शरीरातील प्रमाण कमी झाल्यास अनेक विकार डोके वर काढतात. उतारवयात शरीराला या घटकांची जास्त गरज असते. त्यामुळे वयाच्या 50 नंतर शरीराला आवश्यक ते घटक मिळतील याकडे लक्ष देण्याची गरज असते.

उतारवयात सांधेदुखी, हात-पाय, कंबरदुखी किंवा पाठदुखी सतावते. वयोमानानुसार हाडांची झीज झाल्याने हा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियममुळे पेशी, चेतासंस्था आणि रक्त वाहिन्या योग्य प्रकारे काम करतात. 50 वर्षांवरील महिला आणि 60 वर्षांवरील पुरुषांना इतरांच्या तुलनेत 20 टक्के जास्त कॅल्शियमची गरज असते. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी दूध, दही, पनीर यांचा समावेश करावा.

विटामीन बी 12 मुळे रक्त आणि पेशींच्या निर्मितीसाठी मदत होते. नेहमीच्या आहारातून उतारवयात शरीराला आवश्यक असलेले बी 12 विटामीन मिळत नाही. त्यामुळे गोळ्या आणि फळांद्वारे घेण्याचा सल्ला देण्यात येतो. मासे, अंडे आणि दूधाच्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. या पदार्थांत बी 12 विटामीन मोठ्या प्रमाणात असते.

पेशी, कोशिका आणि रोगप्रतिकारक शक्ती यांना योग्य प्रकारे काम करण्यासाठी विटामीन डी ची गरज असते. कोवळा सूर्यप्रकाश हा विटामीन डीचा उत्तम स्रोत आहे. मात्र, ठराविक वयानंतर शरीर सूर्यप्रकाशापासून विटामीन डी बनवू शकत नाही. त्यामुळे शरीरात विटामीन डी ची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे मासे खावेत. तसेच गरज भासल्यास वैद्यकीय सल्ल्याने विटामीन डी च्या गोळ्या घ्याव्यात.

उतारवयात शरीराला विटामीन बी 6 ची खूप गरज असते. बी 6 विटामीन स्मरणशक्तीला बळकटी देते. तसेच विविध प्रकारच्या आजाराच्या विषाणूशी लढण्यातही विटामीन बी 6 ची महत्त्वाची भूमिका असते. छोलेसारखे पदार्थ, कडधान्ये, फॅटी अॅसिड असलेले मासे या विटामीनच्या उत्तम स्रोत आहेत. मॅग्नेशियम शरीरात हाडांना बळकटी देण्याचे काम करते. त्याचप्रमाणे मधुमेहदेखील नियंत्रणात राहतो. शेंगदाणे, धणे, आणि हिरव्या भाज्यांमधून मॅग्नेशियम मिळते. अनेकदा जास्त औषधे घेतल्यानेही शरीरात मॅग्नेशियमची कमतरता जाणवते.

ओमेगा 3 हे फॅटी अॅसिड शरीरासाठी गरजेचे असते. हे अॅसिड शरीरात नैसर्गिकरित्या तयार होत नाही. त्यामुळे इतर पदार्थातून हे अॅसिड मिळवणे गरजेचे असते. ओमेगा 3 डोळे आणि बुद्धीसाठी महत्त्वाचे असते. अल्जायमरसारख्या रोगापासून बचाव करण्यासाठी ओमेगा 3 ची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे आहारात फॅटी फिश असलेले मासे, अक्रोड यासारखे पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post