एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
करोना आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ठाकरे यांनी फटाके वाजवण्यासह विविध मुद्यांवर संवाद साधला. पाश्चिमात्य देशातील करोना संक्रमणाची उदाहरण देत राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाट येण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर नागरिकांच्या काही गोष्टींवर नाराजी व्यक्त करत ठाकरे यांनी इशाराही दिला.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ब्रिटन, इटली, स्पेनमध्ये पुन्हा लॉकडाउन लागू झाला आहे. नेदरलॅण्डमध्ये घरातल्या घरात मास्क सक्ती केली आहे. याकडे जर बघितलं, तर मी म्हणेन ही लाट नाही, तर त्सुनामी आहे. आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. डॉक्टर, पोलीस लढतायेत. ते कुणासाठी लढतायेत,” असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.
“करोनाविरोधात लढताना आपल्याकडे मास्कशिवाय दुसरं कुठलंही शस्त्र नाही. शंभर वर्षांपूर्वी आलेल्या स्पॅनिश फ्लूनं एक कोटी लोक मरण पावली होती. आता लोकसंख्या किती आहे, त्याच प्रमाण काय होईल? मी घाबरवत नाहीये, पण सर्तक राहण्यासाठी सूचना देतोय. जरी आपण सगळ्या गोष्टी उघडत आहोत. कारण आयुष्य पूर्वपदावर आलंच पाहिजे. अर्थचक्राला गती देतो आहोत. पण गती देताना वेडीवाकडी गती देण्याचा प्रयत्न केला, तर ते दुर्गती होईल. गतीच्याऐवजी अधोगती होईल. पुन्हा जर का लॉकडाउन करण्याची वेळ आली तर तो आपल्याला भारी पडेल. रुग्णसंख्या वाढली आहे. सुविधा वाढल्या आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. सरकारनं बेड वाढवले, पण फक्त बेड वाढवून होणार नाहीत. कारण डॉक्टर आणि आरोग्यसेवक आणायचे कुठून? उद्या जर दुप्पट तिप्पट लाट आली, तर त्रैधातिरिपीट उडू शकते. ती येऊ न देणं हे आपण करू शकता,” असं ठाकरे म्हणाले.
“मी सध्या बघतोय की, मुंबई आणि बाहेर सुद्धा मास्क न घालणारी माणसं जास्त दिसायला लागली आहेत. हे नाही चालणार, अजिबात नाही चालणार. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण हळूवार सुरू करतो आहोत. पण, मास्क घातला नाही, तर त्याला दंड केला जाणार आहे. मी जी आकडेवारी सांगितली, ती माझी नाहीये. डॉक्टरांशी बोलून तुम्हाला सांगतोय. एक करोना पॉझिटिव्ह नागरिक मास्क न घालता गर्दीत फिरला, तर कमीत कमी ४०० जणांना तो संक्रमित करू शकतो. मग ४०० रुग्ण किती जणांना संक्रमित करतील? समाजासाठी आपल्याला या गोष्टीची खबरदारी घ्यावीच लागेल. स्पॅनिश फ्लूच्या वेळीही हीच त्रिसुत्री होती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Post a Comment