आचार्य ठाकरे, आचार्य पवार, मंदिरं कधी सुरू करणार?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

करोनामुळे राज्यातील बंद करण्यात आलेली धार्मिक स्थळं अद्यापही खुली करण्यात आलेली नाहीत. राज्य सरकारकडून एक एक गोष्ट सुरू केली जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी विरोधक आक्रमकपणे मागणी करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आंदोलन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत मंदिरं सुरू करण्याचं आश्वासन आंबेडकर यांना दिलं होतं. याच मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख आचार्य असा करत सवाल उपस्थित केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला येथे माध्यमांशी बोलत होते. राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मुद्यावर आंबेडकर म्हणाले,”आचार्य उद्धव ठाकरे, आचार्य अजित पवार आणि आचार्य बाळासाहेब थोरात मंदिरं कधी सुरु करणार आहात? आचार्य आणि हभप यांचं वाकडं आहे का?” हभप यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं म्हणून यांना राग आला आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.

“राज्यातील सर्व मोठ्या मंदिरांनी सरकारला एक ऑफर दिली होती. भाविकांसाठी मंदिरं सुरु करा, आम्ही चाचणी करतो. करोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी मंदिरांची असेल. सरकार सांगेल तिथे कोविड सेंटर उभे करण्याची तयारी मंदिरांनी दाखवली होती, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला.

मंदिरं कधी उघडणार?
“सगळे विचारताहेत मंदिरं कधी उघडणार? उघडणार आहोतच. पण, जरा हे दिवाळी आणि नंतरचे १५ दिवस जाऊद्या. ज्येष्ठांनी बाहेर पडू नये म्हणून आपण जपतोय. या सगळ्यांची काळजी घेऊनच हा निर्णय घेतलाय आपण. लवकरच त्यासाठीही नियमावली बनवू. चपला मंदिराबाहेर काढा, पण मास्क कधीच काढू नका,” असं म्हणत दिवाळीनंतर मंदिरं खुली करण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी आज (८ नोव्हेंबर) दिले आहेत. जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी या मुद्यावर भाष्य केलं.

Post a Comment

Previous Post Next Post