अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन स्थापणार करोना टास्क फोर्स; भारतीय वंशाचे विवेक मूर्तीं होणार सहअध्यक्ष?

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले डॉक्टर विवेक मूर्ती यांची अमेरिकेच्या करोना संदर्भातील टास्क फोर्सच्या सहअध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन या टास्क फोर्सची निर्मिती करणार आहेत. सोमवारी याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मूळचे भारतातील कर्नाटक राज्याशी संबंधित असलेले विवेक मूर्ती (वय ४३) यांना सन २०१४ मध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचे १९ वे सर्जन जनरल म्हणून नियुक्त केलं होतं. ब्रिटनमध्ये जन्मलेले मूर्ती हे ३७ वर्षांचे असतानाच या पदावर विराजमान होणारे सर्वात तरुण व्यक्ती होते. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं त्यांना या पदावरुन हटवलं होतं.

राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी शनिवारी रात्री डेलावेयरच्या विलमिंगटनमध्ये आपल्या विजयाच्या भाषणात म्हटलं होतं, “आम्ही कोविड संदर्भातील योजनांच्या मदतीसाठी आणि २० जानेवारी २०२१ पासून याच्या अंमलबजावणीसाठी आघाडीच्या वैज्ञानिक आणि विशेषज्ञांच्या गटाची घोषणा करेन.” मात्र, या टास्क फोर्सचं नेतृत्व कोण करेल याची माहिती बायडन यांनी दिली नव्हती. दरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने म्हटलंय की, माजी सर्जन जनरल डॉक्टर मूर्ती आणि माजी खाद्य आणि औषध प्रशासन आयुक्त डेविड केसलर यांना या टास्क फोर्सचे सहअध्यक्ष नियुक्त केले जाऊ शकते.

टास्क फोर्स काही दिवसांत बैठकांना सुरुवात करु शकते. निवडणूक प्रचारादरम्यान मूर्ती सार्वजनिक आरोग्य आणि करोना विषाणूच्या मुद्द्यांवर बायडन यांचे सर्वोच्च सल्लागारांपैकी एक सल्लागार म्हणून पुढे आले होते. अनेकांचं असंही म्हणणं आहे की विवेक मूर्ती यांना बायडन सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणूनही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असंही वॉशिंग्टन पोस्टने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post