एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
बाहेर फिरणाऱ्यांपैकी कोणाच्या तोंडाला मास्क लावलेला नसल्यास आता पोलिस नाईक ते पोलिस निरीक्षकांपर्यंतचे अधिकारी अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. तसे अधिकार जिल्हा व पोलिस प्रशासनाने त्यांना दिले आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची त्रिसूत्री आता सक्तीची झाली आहे. या त्रिसूत्रीचे उल्लंघन करणारांविरुद्ध साथरोग अधिनियम 1897 कलम 2(1) नुसार कारवाई होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्याउपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात आगामी कालावधीत कोविड-19 विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्याावर मास्क वा रुमाल वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियममधील तरतुदीनुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क वा रुमाल वापरणे व सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) पाळण्य़ाबाबत नागरिकांना निर्देशही दिले गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर आता, मास्क वा रुमाल लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे (सामाजिक अंतर) उल्लंघन केल्यास जिल्ह्यातील पोलीस आस्थापनेवरील पोलीस नाईक ते पोलीस निरीक्षक या दर्जाचे पोलीस अंमलदार यांना असे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध 100 रुपये दंडात्मक रक्कम आकारणे व वसुल करणेबाबत प्राधिकृत केले गेले आहे.
Post a Comment